52 गुन्हे करणार्‍या दोघांना पोलिसांनी श्रीरामपुरात पकडले

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
52 गुन्हे करणार्‍या दोघांना पोलिसांनी श्रीरामपुरात पकडले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूरसह नगर जिल्ह्यात चेन स्नॅचिंग तसेच इतर गुन्हे करणार्‍या दोघा जणांना पोलिसांनी पकडले. त्यांनी आतापर्यंत 52 गुन्हे केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यातील एकाकडून पोलिसांनी पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर शहरात ही कारवाई केली.

जिल्ह्यातील चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणार्‍या गुन्हेगांराची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना दिल्या होत्या. या आदेशानुसार श्री. कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अशा गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, बबन मखरे, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरदंले, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे, मेघराज कोल्हे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे व चालक पोलीस नाईक भरत बुधवंत यांनी मिळून आरोपींची माहिती व शोध घेत होते.

यावेळी श्रीरामपूर येथील कंबर मिर्झा याने त्याच्या साथीदारांसह चेन स्नॅचिंग करून चोरलेले सोन्याचे दागिने श्रीरामपूर शहरातील श्रीरामपूर-पुणतांबा जाणारे रोडवरील हॉटेल मिरावली येथे विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी खात्रीशिर माहिती श्री. कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने त्यांनी याबाबत खात्री करून कारवाईच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी श्रीरामपूर येथे जाऊन हॉटेल मिरावली परिसरात सापळा लावला होता.थोड्याच वेळात याठिकाणी मिळालेल्या माहिती व वर्णनाप्रमाणे एक व्यक्ती संशयित हालचाली करताना पथकास दिसून आल्याने पथकाने त्याला ताब्यात घेत पोलीस असल्याची ओळख सांगून त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने कंबर रहिम मिर्झा (वय 35, रा. वॉर्ड नं. 1, श्रीरामपूर) असे त्याचे नाव असल्याचे सांगितले.

यावेळी पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळील एका काळ्या रंगाच्या कापडी पिशवीत सोन्याचे दागिने मिळून आले. याबाबत त्यास विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार आयूब इराणी (रा. श्रीरामपूर) याचेसोबत अहमदनगर, राहुरी, लोणी, व संगमनेर येथून तेथील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून चोरून आणले असून ते दागिने मोडीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.

त्याने दिलेल्या कबुलीच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख तपासले असता त्यांच्यावर एकूण 4 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यात तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 907/2022 भादंविक 392, राहुरी 969/2022 भादंविक 392, 34, संगमनेर शहर 851/2022 भादंविक 392 व लोणी 497/2022 भादंविक 392, 34 या गुन्ह्याचा समावेश आहे. वरील गुन्ह्यात चोरी गेलेले एकूण 55 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 2,75,000 रुपये किंमतीचे दागिने कंबर रहिम मिर्झा (रा. श्रीरामपूर) याच्या ताब्यात मिळून आले. त्यामुळे त्याला लोणी पोस्टे गुरनं 497/22 भादंविक 392, 34 या गुन्ह्यात पुढील कार्यवाहीसाठी लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

तसेच त्याच्या साथीदाराचा त्याचे राहते घरी जाऊन शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेत त्याचे नाव गाव विचारले असता त्याने भुर्‍या उर्फ आयुब फैयाज इराणी (वय 50, रा. इराणी गल्ली, वॉर्ड नं.1, श्रीरामपूर) असे त्याचे नाव असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वरील गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता त्याने कंबर मिर्झा याचेसोबत गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यालाही लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com