मित्रावर गोळीबार करणारा आरोपी २४ तासात जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
मित्रावर गोळीबार करणारा आरोपी २४ तासात जेरबंद

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

जामखेड तालुक्यातील जवळके शिवारात गावठी कट्ट्यातून गोळीबार करून मित्रास जखमी करणार्‍या

एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 25 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अब्दुल कमाल शेख (वय-30 रा. जवळके ता. जामखेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर बारीकराव शहाजी जावळे हे जखमी झाले आहेत.

जवळके गावचे शिवारात, सटवाई मंदिराचे परिसरातील मोकळ्या जागी अब्दुल कमाल शेख व जखमी बारीकराव शहाजी जावळे यांच्यासह इतर तीन ते चार जण बसलेले होते. यावेळी अब्दुल शेख याच्याकडील गावठी बनावटीचे पिस्टल हाताळतांना त्याच्या पिस्टल मधुन फायर झाला. यामध्ये जावळे हे जखमी झाले.

त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना माहिती मिळाली कि हा फायर अब्दुल शेख याने केला आहे. शेख याला पोलिसांनी जवळके येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने कबूली दिली.

पोलिसांनी त्याला अटक करून जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, प्रभारी उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com