पाथर्डीत सराईतावर एमपीडीए कारवाई

पोलिसांनी लातूर येथून केले जेरबंद
Crime news
Crime news

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी येथील एका सराईतावर पाथर्डी पोलीसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती,वाळू माफिया, जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणार्‍या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणेबाबतचा अधिनियम 1981 चे कलम 3 ( 2 ) ( एमपीडीए) प्रमाणे कारवाई केली आहे. अहमदनगरच्या पोलीस पथकाने त्याचा शोध घेऊन लातूर येथून जेरबंद करत त्याची नाशिक कारागृहात रवानगी केली आहे.

विजय बाबुराव आव्हाड (38,रा.जांभळी, ता.पाथर्डी) असे एमपीडीए कारवाई करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. कारवाई प्रस्तावित झाल्यापासून आव्हाड फरार झाला होता. त्याच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, फसवणूक, सरकारी कामात अडथळा व अवैध दारुविक्री असे गंभीर स्वरुपाचे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर व न्यायालयातून जामिनावर सुटल्यानंतर आरोपी विजय बाबुराव आव्हाड याच्या गुन्हेगारी कारवाया चालूच होत्या.

त्यामुळे आरोपी विजय आव्हाड यास एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्यासाठी पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.रामेश्वर कायंदे,पो.कॉ.देविदास तांदळे यांनी तीन महिने अत्यंत गोपनीयरित्या काम करून सन 2013 ते 2021 या काळातील आव्हाड याच्यावरील 11 गुन्ह्यांचा अत्यंत बारकाईने अभ्यास त्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द करण्यासाठी 319 पानांचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचेकडे प्रस्ताव सादर केला होता.

त्यांनी हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे सादर केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी 19 मे 2022 रोजी प्रस्तावावर अंतिम निर्णय घेऊन आरोपीस एक वर्षाकरिता स्थानबध्द करण्याचे आदेश पारित केले आहेत. आदेश पारित झाल्यानंतर आरोपी विजय आव्हाड हा फरार झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची नेमणूक करून त्यास लातूर शहरातील शारदानगर येथून ताब्यात घेतले. त्यास ताब्यात घेऊन पुढील आवश्यक कारवाईसाठी नाशिक कारागृह येथे रवाना केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com