सराईत गुन्हेगाराने विवाहितेला छेडले

संतप्त जमावाकडून गुन्हेगाराच्या घरावर दगडफेक || हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
सराईत गुन्हेगाराने विवाहितेला छेडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार फैजान कलीम बागवान (रा. पारशाह खुंट) याच्याविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. रविवारी सायंकाळी नगर शहरात ही घटना घडली. रविवारी सायंकाळी फिर्यादी व त्यांची मैत्रीण घरासमोरील पार्किंगजवळ थांबलेल्या असताना फैजान बागवान त्याच्या दुचाकीवरून तेथे आला.

फिर्यादीने त्याला ओळखले. तो त्यांचा दोन महिन्यापासून पाठलाग करत होता. त्याने फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे बोलून गाडीवर बसण्यास सांगितले. गाडीवर बसली नाही तर,‘मी तुझ्या अंगावर अ‍ॅसिड फेकील’, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फैजान बागवान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द विनयभंग, मारहाण, खूनाचा प्रयत्न आदी कलमान्वये 10 ते 12 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान बागवान याने विवाहितेला छेडल्यानंतर रविवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता.

काही व्यक्तींनी बागवान याच्या धरती चौक येथील घरावर दगडफेक करून वाहनांचे नुकसान केले. रात्री साडेदहा वाजता बागवान याची आई व भाऊ घरात असताना कुणाल भंडारी, बंटी ढापसे, अजय वराडे, निखिल धंगेकर व इतर 20 ते 25 व्यक्तींनी बागवान यांच्या घरावर दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडल्या. घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान केले. या प्रकरणी फैजान बागवान याच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भंडारी, ढापसे, वराडे, धंगेकर यांच्यासह 20 ते 25 अनोळखीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंदुत्ववादी संघटनां आक्रमक

फैजान बागवानवर कठोर कारवाई करून त्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेना, भाजप, शिवसेना शिंदे गटासह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. पीडित विवाहितेसह तिच्या कुटुंबीयांनी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम व महापौर रोहिणी शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक पाटील यांची भेट घेतली. यावेळी हिंदूराष्ट्र सेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, वंदे मातरम् प्रतिष्ठान आदी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. फैजान बागवान हा सराईत गुन्हेगार असून या आधीही त्याच्यावर विनयभंग, सदोष मनुष्यवध, जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण असे गंभीर गुन्हे शहरात दाखल आहेत. त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने खासदार सदाशिव लोखंडे, गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संपर्क प्रमुख सचिन जाधव यांनी केली. भाजपच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या नेतृत्वाखाली तडीपार करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलीस अधीक्षक पाटील यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com