शेतकर्‍यांची कोट्यवधीची देणी घेऊन पसार असलेला आरोपी अद्यापही बाहेरच

तपासाची सुत्रे पोलीस उपअधिक्षक मिटके यांनी स्वतःकडे घेतले
शेतकर्‍यांची कोट्यवधीची देणी घेऊन पसार असलेला आरोपी अद्यापही बाहेरच

माळवाडगांव |वार्ताहर| Malwadgav

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगांव येथील किराणा व भुसार आडत व्यापारी मुथ्था बंधू शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची देणी बुडवून फरार होऊन दुसरा आठवडा उलटला,

तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही तालुका पोलीस तपास संथ गतीने करत असल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी जिल्हा पोलीस प्रमुखाकडे केल्यानंतर माळवाडगांव येथे पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांनी पैसे अडकलेल्या शेतकर्‍यांची बैठक घेऊन या तपासाची सुत्रे स्वत:कडे घेऊन तातडीने तपास करण्याचे आश्वासन दिले.

काल शनिवार दि. 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री नियोजनबध्द मार्गाने रमेश रामलाल मुथ्था, गणेश ऊर्फ मुन्ना रामलाल मुथ्था,या दोघा बंधूंनी कुटुंबातील बारा सदस्यांसह 1.30 वाजता रहस्यमयरित्या पलायन केले. दुसर्‍या दिवशी रविवारी सकाळी हा हा म्हणता वार्ता गावांसह परिसरात पसरली.

गोरगरीब कष्टकरी शेतकर्‍यापासून बड्या बागायतदारासह शेतकर्‍यांचा आकडा 25 कोटीवर तर श्रीरामपुरातील असंख्य व्यापारी, भिसी चालक, अंबिका महिला पतसंस्था, बँक ऑफ महाराष्ट्र, धुळे येथील सोयाबिन मिल उचल मिळून एकुण 40 कोटीला चंदन लावून मोठ्या भुषनाने बांधलेली इमारत मोटार कार सोडून परांगदा झाले.

माळवाडगांव ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी शेतकर्‍यांकडून शंभर पानी तपास कामी कागदपत्रांची फाईल ताब्यात घेतली. प्रत्येकाचे म्हणणे सविस्तर ऐकून तपासास दिशा देणार्‍या टिप्स नोंदी डायरीत घेतल्या. मिळालेली काही गोपनिय माहीती ओपन केल्यास हस्तकामार्फत आरोपीपर्यत पोहचल्यास तपासात अडथळे निर्माण होतात.

प्रथम आरोपींचा तपास हे लक्ष्य असून, उर्वरित घडलेल्या घडामोडीत त्याची वाहने, माल, घरगुती सामान हा तपासाचा दुसरा भाग असणार असल्याचे सांगून मिटके यांनी आपल्या सहकार्‍यासमवेत मुथ्था इमारत दुकान स्थळाचीही बारकाईने पाहणी केली. ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब चिडे, शेतकरी पंचकमेटीतील तंटामुक्ती अध्यक्ष सुदाम आसने, नानासाहेब आसने, गणपतराव आसने, विजयराव आसने, भास्करराव आसने , दत्तात्रय दळे,सचिव- शरद आसने, पाराजी दळे, विठ्ठल लटमाळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com