सराईत गुन्हेगार बागवानविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा

महिलेच्या अंगावर दुचाकी घालून केला जीवे मारण्याचा प्रयत्न || कोर्टात साक्षीदाराला दिला दम
सराईत गुन्हेगार बागवानविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार फैजान कलीम बागवान (रा. पारशाह खुंट) याच्याविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान त्याने पीडित विवाहितेच्या अंगावर दुचाकी घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. यामुळे बागवानविरोधात खूनाचा प्रयत्न या वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. रविवारी सायंकाळी नगर शहरात ही घटना घडली होती. रविवारी सायंकाळी फिर्यादी व त्यांची मैत्रीण घरासमोरील पार्किंगजवळ थांबलेल्या असताना फैजान बागवान त्याच्या दुचाकीवरून तेथे आला. त्याने फिर्यादीच्या अंगावर दुचाकी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे बोलून गाडीवर बसण्यास सांगितले. गाडीवर बसली नाही तर,‘मी तुझ्या अंगावर अ‍ॅसिड फेकील’, अशी धमकी दिली असल्याची फिर्याद पोलिसांत दाखल आहे.

दरम्यान बागवानवर कठोर कारवाई करून त्याचा कायमचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शिवसेना, भाजप, शिवसेना शिंदे गटासह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची सोमवारी भेट घेतली. बागवान हा सराईत गुन्हेगार असून या आधीही त्याच्यावर विनयभंग, सदोष मनुष्यवध, जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कोर्टात साक्षीदाराला दिला दम

तोफखाना पोलीस ठाण्यात फैजान कलीम बागवान विरोधात विनयभंग, खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याने या गुन्ह्यातील साक्षीदाराला दम दिल्याची घटना घडली. या प्रकरणी बागवान विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे अंमलदार दत्तात्रय कोतकर यांनी फिर्याद दिली आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात बागवान याला अटक करून सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी बागवान याने दाखल गुन्ह्यातील साक्षीदाराला दम दिला. मी कोर्टातुन बाहेर सुटून आल्यावर तुझ्याकडे पाहुन घेईल, असा दम दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com