वाढती गुन्हेगारी शिर्डीकरांसाठी चिंतेची बाब

पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालावा || ग्रामस्थांची मागणी
वाढती गुन्हेगारी शिर्डीकरांसाठी चिंतेची बाब

शिर्डी | Shirdi

शिर्डी शहरात गंठणचोरी, रोड रोमिओंचा सुळसुळाट, पाकीटमारी, अवैध दारूविक्री, मटका जुगार, चाकू हल्ला, तसेच खुनाच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. वाढती गुन्हेगारी शिर्डीकरांसाठी चिंतेची बाब ठरत असून शिर्डी पोलिसांनी वेळीच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शिर्डीत देश विदेशातून येणार्‍या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे पाकिटमार टोळ्या, महिलांचे मंगळसूत्र तसेच सोनसाखळी चोरीचे वाढते प्रमाण, दुचाकी वाहनांची चोरी, चाकूहल्ला, खून अशा प्रकारचे विविध गुन्हेे शिर्डी पोलिसांना डोकेदुखी ठरत आहे. अनेक उपनगरात हॉटेल, लॉजिंगचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे साई समाधीचे दर्शन झाल्यावर महिला भाविक शिर्डीतील रस्त्यावरून संध्याकाळी, रात्री आरती झाल्यानंतर हॉटेलच्या निवासस्थानी पायी जातात.

याच संधीचा फायदा घेत सोनसाखळी चोर नजर ठेवून भरगाव वेगाने दुचाकीवर पाठलाग करत अगदी काही क्षणात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी तसेच किमती सोन्याचे दागिने लुटून नेण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. या चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांपुढे आहे. मात्र हॉटेल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलीस तपासाला अडचणी येतात ही बाब पुढे आली आहे. तर प्रत्येक उपनगरात भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी बहुभाषिक पोलीस हेल्पलाईनचे मोठे फलक लावले तर भाविकांना तक्रार देण्यास मदत होईल.

शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणात हॉटेल व लॉजिंग असल्यामुळे या ठिकाणी परराज्यातील गुन्हेगार शिर्डीत येऊन आश्रय घेतात तसेच मद्य प्राशन करून महिलांच्या, विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी सरकारने पोलीस दामिनी पथकाची स्थापना केली आहे. मात्र ही सेवा शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये बंद असल्याने अशा चोरीच्या घटनेत वाढ होताना लक्षात येते. शिर्डीमध्ये साई संस्थानच्या कॉलेजकडे अनेक रोडरोमिओंचा रेसर बाईकवरचा स्टंट आणि त्यामाध्यमातून विद्यार्थी तरुणींनींना होणारा त्रास, छेडछाड याचेही प्रमाण वाढले आहे. याची तक्रार अनेक तरुणींनी पालकांकडे केली असून सध्या सर्वजण चिंतेत आहे.

रोडरोमिओं दररोज ट्रिपलशीट, विना लायसेन्स, विनानंबरच्या दुचाकीवरून स्टंटबाजी करून कॉलेजच्या हेलिपॅड रस्त्यावर दुपारच्या वेळी धुमाकूळ घालत असतात. त्यामुळे विद्यार्थींनी वर्गात मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर कायमचाच पायबंद घालण्यासाठी वाहतूक पोलीस व दामिनी पथक यांनी कारवाईचा बडगा उगारला तर भविष्यात महिला व विद्यर्थिनींसाठी मोठा आधार व सुरक्षितता मिळू शकते. याच कॉलेज रोडवर अनेक बेकायदेशीर दारुचे दुकाने थाटली. त्याचाही त्रास विद्यार्थ्यांना होत आहे.

तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी महिला भाविकांना व शालेय विद्यार्थींना छेडछाडीच्या, चोरीचा, लुटमारीचा, स्टंटबाजीचा त्रास होणे ही स्थानिकांच्या दृष्टीने चिंतेचा विषय असून यावर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी वाढत्या गुन्हेगारीची दखल घेऊन धडक कारवाई करून दहशतमुक्त वातावरण निर्माण करून भाविकांना व शालेय विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागर्णी शिर्डी ग्रामस्थांंनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com