
राहुरी (प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे नंदलाल झंवर या कांदा व्यापाऱ्याच्या गोडावूनमधून गावरान कांदा व बॅटरी असा सुमारे ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दि. २४ नोव्हेंबर रोजी घडली होती. या घटनेबाबत पोलिसांत वांबोरी येथील तिघाजणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झंवर यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. २४ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजे दरम्यान नंदलाल झंवर यांच्या शेतामधील उघड्या गोडावूनमधून ३१ हजार २५० रुपये किमतीच्या गावरान कांदा असलेल्या २५ गोण्या तसेच ५ हजार रुपये किमतीची ट्रकची बॅटरी असा एकूण ३६ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता.
कांदा व्यापारी नंदलाल झंवर यांनी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत आरोपी अमोल प्रकाश इरले, विजय ऊर्फ अन्नू म्हसू माने तसेच मनोज कचरू धोत्रे सर्व रा. वांबोरी या तिघा जणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.