वांबोरीत अश्लिल चित्रफितींच्या रॅकेटचा पर्दाफाश
सार्वमत

वांबोरीत अश्लिल चित्रफितींच्या रॅकेटचा पर्दाफाश

एक महिला आणि दोन पुरूषांना अटक; फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची वसुली

Arvind Arkhade

उंबरे|वार्ताहर|Umbare

राहुरी तालुक्यातील वांबोरीमध्ये महिला व मुलींचे फेसबूक आणि व्हॉट्सअ‍ॅपवरील फोटोला अश्लील फोटोसोबत एडीट केल्याप्रकरणी वांबोरीतील एक महिला व दोन पुरूषांना सायबर क्राईम शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात आणखी किती जण सहभागी आहेत? याचा पोलीस कसून तपास करीत आहेत.

ही टोळी महिलांचे फेसबुकवरचे फोटो तसेच फेसबुक फ्रेंड झाल्यानंतर मोबाईल नंबर मिळवित व्हॉट्सअ‍ॅप डिपीचे फोटो डाऊनलोड करीत अश्लील चित्रफिती बनविण्याचा कारनामा करीत होते. त्या चित्रफिती संबंधित व्यक्तींना पाठवून व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी वसूल करीत होते. याप्रकरणी बरेच पीडित आता समोर येऊन फिर्याद देत आहेत.

संबंधित पीडितांनी खंडणी देऊन मौन बाळगले होते. मात्र, आता याप्रकरणाला वाचा फुटली आहे. संबंधित मोबाईल नंबर हा एका महिलेच्या नावावर आहे. पुढील चौकशीसाठी पोलिसांनी जुने वापरलेले मोबाईल विक्रेत्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

नगर येथील फिर्यादीचे फेसबुक अकाऊंटवरील फोटो अज्ञात इसमाने कॉपी करून घेऊन त्याचे अश्लील फोटो बनविले. ते फोटो फिर्यादीच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून ते सोशल मीडियावर व्हायरल न करण्यासाठी अज्ञात इसमाने फिर्यादीला 30 हजार रुपयांची खंडणी मागितली होती. त्यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस शाखा अहमदनगर येथे भादंवि. 384 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पोसई प्रितक कोळी, पोहेकॉ. उमेश खेडकर, पोना. मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, राहुल हुसळे, पोना. विशाल अमृते, पोकॉ.अरुण सांगळे, मपोना. स्मिता भागवत, पोहेकॉ. वासुदेव शेलार यांच्या पथकाने या गुन्ह्याचे तांत्रीक विश्लेषण करून गुन्हा उघडकीस आणला.

तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेऊन यातील वांबोरी ता. राहुरी येथे सापळा रचून आरोपी अमोल उत्तम कुसमुडे याचा पाठलाग करून त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच हा गुन्हा त्यानेच केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे. कुसमुडे यास अटक केली असून त्यास दि.18 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

चौकशी दरम्यान कुसमुडे याने वांबोरी गावातील मेघराज नामक व्यक्तीच्या फेसबुक अकाउंटवरून फोटो कॉपी करून घेऊन त्यांचे अश्लील फोटो बनवून सोशल मीडियावर व्हायरल न करण्यासाठी पैशाची मागणी करून खंडणी मागितली आहे.

याबाबत आरोपीविरूद्ध सायबर क्राईम पोलीस शाखा अ.नगर गु.रजि.नं 2) 1 90/2020 भादंवि. 384 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67(अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याप्रमाणे आरोपीने एका व्यापारी आणि त्याच्या पत्नीचे अश्लील फोटो बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिलेली आहे. याबाबत माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीविरूद्ध आतापर्यंत एकूण तीन गुन्हे दाखल असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण परदेशी करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com