
वैजापूर | प्रतिनिधी
विविध कंपनीच्या मोटारसायकल, विहिरीतील विद्युत पंप, जनरेटरसह विविध चोऱ्यातील अट्टल स्थानिक चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात शिऊर पोलिसांना यश आले आहे गुन्ह्यातील आरोपीकडून विविध कंपनीच्या 10 दुचाकी, विहिरीतील 06 विद्युत पंप, 3 पिटर, 4 स्टार्टर असा एकूण सात लाख पंचाहत्तर हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तुषार दादासाहेब पगार (वय.24) व ऋषिकेश नानासाहेब हार्दे दोघेही रा. शिऊर ता. वैजापूर असे जबरी गुन्ह्यातील आरोपीचे नावे आहेत.
अधिक माहितीनुसार दुचाकीचोऱ्यासह, घरफोडी, विद्युत पंप, तसेच किरकोळ चोऱ्यांची मालिका काही दिवसापासून परिसरात सुरु होती. शिऊर परिसरासह हद्दीत अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तक्रारीचा वाढता ओघ बघता पोलीस चोरट्यांच्या शोधात होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी शिऊर पोलीस ठाणेप्रमुखांचा कार्यभार घेतल्यापासून हद्दीतील गुन्हेगारी संपुष्टात आणण्याची कामगिरी हाती घेतली होती.
मागील काळातील बॅकलॉग भरण्याच्या दृष्टीने गुन्हेगारी मोडीत काढण्याचे तगडे आव्हान त्यांच्यासमोर होते. दैनंदिन घटना, कायदा सुव्यवस्था आभादित राखणे यासह विविध प्रकारच्या प्रलंबित गुन्ह्यातील तपासाची यंत्रणा राबवत असतांना परिसरातील वाढत्या चोऱ्यांच्या प्रमानाच्या दृष्टीने तपास सुरु असतांना येथीलच दोघे तरुणांनी विविध भागातून मोटारसायकल, शेती उपयोगी वस्तू चोरी करून आणून आपल्या राहत्या शेतात संग्रहित केल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली यानुषंगाने पोलिसांनी तपास केला असता संशयित आरोपी तुषार पगार याच्या शेतात विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या दुचाकी, विद्युत पंप इतर मुद्देमाल मिळाला.
याबाबाबत तुषारला ताब्यात घेत चौकशी केली असता गावातीलचं अन्य एक साथीदार ऋषिकेश नानासाहेब हार्दे याचा चोरीत समावेश असून विविध जिल्ह्यातील नांदगाव, चाळीसगाव, येवला इतर ठिकाणाहून मोटारसायकल, विद्युत पंप, जनरेटर, मोटार स्टार्टर विविध चोऱ्या केल्याची कबुली दिली. सदरील कामगिरी सहाय्यक पोलीस अधीक्षक,महक स्वामी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, अंकुश नागटिळक, पो.ना. विशाल पैठणकर, आर. आर. जाधव अविनाश भास्कर, गणेश गोरक्ष, सविता वर्पे, देवराव तायडे, गणेश जाधव आदीच्या पथकाने केली.