गावठी कट्ट्यासह वडाळा महादेव येथे सराईत गुन्हेगारास केले जेरबंद
सार्वमत

गावठी कट्ट्यासह वडाळा महादेव येथे सराईत गुन्हेगारास केले जेरबंद

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

तालुक्यातील वडाळा महादेव याठिकाणी आंतरराज्यीय घरफोड्या करणार्‍या सराईत गुन्हेगारासह एका अल्पवयीन मुलास काल श्रीरामपूर पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी कट्ट्यासह विनानंबरची मोटारसायकल जप्त केली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव-अशोकनगर परिसरात आंतरराज्यीय घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार बबलू मोहन चव्हाण (रा. कमालपूर, ता. श्रीरामपूर) हा त्याच्या साथीदारासह गावठ्ठी कट्टा घेऊन येत असल्याची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी वडाळा फाटा येथे सापळा लावून बबलू मोहन चव्हाण (रा. कमालपूर, ता. श्रीरामपूर) व त्याचा साथीदार अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून एका विना नंबरच्या मोटारसायकलसह एक गावठी कट्टा व दोन काडतुसेही हस्तगत करण्यात आली आहेत.

याप्रकरणी पो. कॉ. किशोर जाधव यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 1144/2020 प्रमाणे बबलू मोहन चव्हाण व त्याचा साथीदार अल्पवयीन मुलाविरुध्द भादंवि कलम 3, 7, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी बबलू मोहन चव्हाण याने यापूर्वी ठाणे जिल्ह्यातील किन्हवली व शहापूर पोलीस स्टेशन, नेवासा, गंगापूर, श्रीरामपूर तालुका व उत्तरप्रदेश तसेच दिल्ली राज्यात गुन्हे केले आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक़ अखिलेशकुमार सिंह, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट, पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, दत्तात्रय उने, पो. हे. कॉ. जालिंदर लोंढे, पो. कॉ. पंकज गोसावी, सुनील दिघे, गणेश गावडे, किशोर जाधव, महेंद्र पवार, अर्जुन पोकळे, किशोर जाधव, महेंद्र पवार या पथकाने केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com