व्याजाचे पैशे मागितल्याने उंचखडकला वृद्धाचा खून,आरोपी अटकेत
सार्वमत

व्याजाचे पैशे मागितल्याने उंचखडकला वृद्धाचा खून,आरोपी अटकेत

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

व्याजाचे पैशे मागितल्याचा राग येऊन उंचखडक खुर्द येथील एका 62 वर्षीय वृद्धास विटकर मारली. यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील उंचखडक खुर्द गावात घडली. तुकाराम बुधा उघडे ( वय 62,रा.उंचखडक खुर्द) असे या घटनेत मृत्यूूमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे.

याबाबत अकोले पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, मयत तुकाराम उघडे व आरोपी कैलास यशवंत घोडके (वय 45,रा.उंचखडक खुर्द) हे चांगले मित्र होते. कैलास घोडके यांना पैशाची अडचण असल्याने उघडे यांनी त्यास 50 हजार रुपये दोन वर्षापूर्वी उसने दिले व त्यापोटी महिन्याला व्याज द्यायचे असे ठरले.

व्याजाची रक्कम उघडे यांनी घोडके यांचेकडे मगितल्याचा राग येऊन शनिवारी सायं.6.30 वाजेच्या सुमारास उंचखडक खुर्द गावातील एस.टी. स्टॅण्ड जवळ आरोपीने तुकाराम बुधा उघडे यांच्या डोक्यात वीट मारली. यात उघडे गंभीर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अकोले पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित हे अकोलेत दाखल झाले.त्यांनी,पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे व उपनिरीक्षक दीपक ढोमणे यांनीही घटनास्थळी भेट दिली व तपासाची चक्रे वेगाने फिरविली.त्यानंतर आरोपी कैलास घोडके यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

रात्री उशिरा मयताचा भाऊ नामदेव बुधा उघडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात आरोपी कैलास यशवंत घोडके याचे विरुद्ध खुनाचा व एट्रोसिटी कलमा नव्ये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित हे करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com