दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन फिरणार्‍या तरुणाला पोलिसांनी पकडले

दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन फिरणार्‍या तरुणाला पोलिसांनी पकडले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरात दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन दहशत निर्माण करणार्‍या शाहरुख शेखला पोलिसांनी पकडले. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर 2 मधील साईनगर येथील कच्चा रोडने एक इसम दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन फिरत आहे अशी माहिती श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांचे पथक साईनगर येथे गेले असता समोरून एक इसम दोन हातात दोन तलवारी घेऊन येताना दिसला.

पोलीस त्याच्या दिशेने गेले असता तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याचे नाव विचारले असता त्याने शाहरुख अन्वर शेख (वय 21 रा. शनी चौक, वॉर्ड 2, श्रीरामपूर) असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पंचासमोर त्यांची अंगझडती घेतली त्यामध्ये त्याच्या ताब्यात असलेल्या दोन लोखंडी तलवारी किंमत एकूण 1 हजार 100 असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पोलीस कॉन्स्टेबल मोहन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 04/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव,पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी,पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे यांनी ही कामगिरी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com