अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घरामध्ये वृद्ध महिला एकटी असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी करत घरातील एक लाख रुपयाची

रोख रक्कम, 90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एक लाख 90 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. शहरातील धर्माधिकारी मळ्यातील सुमन कॉलनीमध्ये गुरूवारी सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद कुमार लक्ष्मीनारायण सोमाणी (वय- 42 रा. धर्माधिकारी मळा, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

गुरूवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरामध्ये त्यांच्या वृद्ध आई एकट्या होत्या. यादरम्यान चोरटा फिर्यादी यांच्या घरामध्ये शिरला. घरात वृद्ध महिला असल्याचा गैरफायदा घेत चोरट्याने घरातील भिंतीला टांगून ठेवलेल्या कपाटाच्या चावीने कपाटाचे लॉक उघडले. कपाटामध्ये ठेवलेले दागिने, रोख रक्कम चोरून पळ काढला.

फिर्यादी घरी आल्यानंतर त्यांना कपाट उघडे दिसले. कपाटातील दागिने व रोकड चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, सहायक निरीक्षक किरण सुरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.