टाकळीभान येथे विजयादशमीच्या रात्री चोरट्यांचा धुमाकूळ, दुचाकीची चोरी

टाकळीभान येथे विजयादशमीच्या रात्री चोरट्यांचा धुमाकूळ, दुचाकीची चोरी

टाकळीभान (वार्ताहर)

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानसह परिसरात दुचाकी चोरींचे प्रमाण वाढले आहे. विजयादशमीच्या रात्री चोरट्यांनी तीन ठिकाणी हात मारला. येथील साई आदर्श मल्टीस्टेट सोसायटीचे दैनदिन ठेव प्रतीनिधी नानासाहेब बोडखे यांची दुचाकी होंडा युनिकॉन घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली.

विजया दशमीच्या रात्री 1.15 च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बोडखे यांची घरासमोर उभी असलेली युनिकॉन दुचाकी (क्र. एमएच 17 सीक्यू 9584) लॉक तोडून चोरून नेली. या चोरीचे दृश्य त्यांच्या घराशेजारी असलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. या दृष्यात तोंड बांधलेले चार चोरटे घराजवळून दुचाकी घेऊन जात असल्याचे दिसत आहे. याच परीसरातील सचिन बेद्रे यांच्या साईकृपा ज्वेलर्सचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक वजन काटा व 2 किलोचा एक गॅस सिलेंडर चोरून नेला. तर श्रीरामपूर-नेवासा रोडवरील दूध डेअरीच्या उभ्या असलेल्या रिकाम्या दुधाच्या टँकरच्या डिझेल टाकीतून सुमारे 150 ते 200 लिटर डिझेल चोरट्यांनी चोरून नेले.

रात्री दिडच्या दरम्यान नानासाहेब बोडखे झोपेतून उठले असता त्यांना घरासमोरील दुचाकी दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी शेजारच्यांना उठवून दुचाकी चोरी झाल्याचे सांगितले. बोडखे व आसपासचे शेजारी यांनी बसस्थानक परिसरात जाऊन दुचाकीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकी अढळून आली नाही.

टाकळीभानसह परिसरात यापुर्वीही अनेक दुचाकींची चोरी झाली आहे. गेल्या महिन्यात डॉ. कांबळे यांची बुलेट चोरी झाली. अद्यापपर्यंत एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. बोडखे यांच्या दुचाकी चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍यानुसार चोरट्यांचा तपास लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, साईकृपा ज्वेलर्समधून चोरी झालेला वजन काटा, गॅस सिलेंडर व दुचाकिच्या नंबर प्लेट टाकळीभान-नेवासा रोडवरील विटभट्टीजवळ मिळून आल्याची माहिती बेद्रे यांनी दिली. बोडखे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार केली असून पोलिसांनी भादंवि कलम 379 प्रमाणे गु.र.नं. 370/2022 दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो. हे. काँ. रवींद्र पवार करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com