
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
घरच्यांचा विरोध डावलून आपल्याशी लग्न कर असा तगादा लावत प्रियकराने वारंवार फोन करून मानसिक त्रास दिल्याने एका अल्पवयीन (वय 17) मुलीने लिंबाच्या झाडास दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. शिवानी पदु भोसले (वय 17 रा. वाळुंज) असे मयत मुलीचे नाव आहे. नगर तालुक्यातील वाळुंज शिवारात ही घटना घडली.
याप्रकरणी तिचे वडिल पदु भाना भोसले (वय 67 रा. वाळुंज) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रियाज झारकन चव्हाण (रा. येवला जि. नाशिक) याच्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. लग्न करण्यासाठी रियाज चव्हाण याने शिवानी हिला 12 जानेवारी व 13 जानेवारी रोजी फोन करून भांडण केले. शिवीगाळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले.
शिवानीने 14 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता वाळुंज शिवारातील गुगळे यांच्या पडीक जमिनीचे बांधालगत लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.