विम्याचा फायदा घेण्यासाठी चक्क ट्रक चोरीचा बनाव; दोघे गजाआड

कुठे घडली घटना?
विम्याचा फायदा घेण्यासाठी चक्क ट्रक चोरीचा बनाव; दोघे गजाआड

श्रीरामपूर | प्रतिनिधी

ट्रक चोरीस गेल्याचा बनाव करुन खोटी फिर्याद दाखल करून विमा कंपनीकडून (Insurance company) विम्याचे पैसे लाटण्याचा प्रयत्न करणार्‍या श्रीरामपूर (Shrirampur) येथील दोघा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (local crime branch police) शिताफीने अटक केली. त्यांच्याकडील 6 लाख रुपये किंमतीचा ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

शहरातील वार्ड नं. 2 मधील बाबरपूरा चौकातील रेहान आयूब शाह (वय 29) यांनी त्यांचे मालकीचा 6 लाख रुपये किंमतीचा अशोक लेलैंड कंपनीचा, दहा टायरचा ट्रक (नं. एमएम-17 बीवाय-5559) 12 ऑगस्ट 2021 रोजी सांयकाळी सम्राटनगर, सुतगिरणी येथील स्टील कंपनीमधून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची फिर्याद दिली होती. त्यावरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. 1 5404/2021 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वीही श्रीरामपूर परिसरात ट्रक चोरीचे गुन्हें घडलेले असल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र पथक नेमून तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते.

तपास सुरु असताना कटके यांना फिर्यादी व त्याचे साथीदारांनी विमा कंपनीकडून विम्याचे पैसे वसूल करण्याचे उद्देशाने सदरचा गुन्हा केला असल्याचीे अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलीस निरिक्षक सोमनाथ दिवटे, सहायक पोलीस निरिक्षक गणेश इंगळे, सहायक फौजदार नानेकर, पोलीस हेड कॉन्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोलीस कॉन्टेबल रविन्द्र धुंगासे, सागर ससाणे, रोहीत येमूल, चालक पोलीस हेड कॉन्टेबल उमाकांत गावडे यांंना श्रीरामपूर येथून फिर्यादी रेहान आयुब शाह याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्याला विश्‍वासात घेवून चौकशी केली असता, त्याने साथीदार ईतू शेख व पप्पू गोरे अशांनी मिळून ट्रकचे विम्याचे पैसे विमा कंपनीकडून वसूल करण्यासाटी ट्रक चोरीस गेल्याचा बनाव करुन पोलीस स्टेशन येथे खोटी फिर्याद दिली असल्याचे सांगीतले.

त्यावरुन इफ्तेकार उर्फ इत्तू इस्माईल शेख, (रा. वार्ड नं. 2, श्रीरामपूर) याला ताब्यात घेवून त्याचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेला ट्रक (नं. एमएम 17, यीवाय-5559) जप्त करुन आरोपींना मुद्देमालासह श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला हजर केले यावेळी पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे (रा. वार्ड नं. 2, श्रीरामपूर) याचा शोध घेतला परंतू तो मिळून आला नाही. पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहेत.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रीमती दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com