एकलहरे-बेलापूर रस्त्यावर दरोडा; तरुणाची निर्घृणपणे हत्या, पत्नीला जबर मारहाण

नगर, बीडचे दोघे ताब्यात || पत्नीचीही चौकशी || दरोड्याचा बनाव
एकलहरे-बेलापूर रस्त्यावर दरोडा; तरुणाची निर्घृणपणे हत्या, पत्नीला जबर मारहाण

टिळकनगर | वार्ताहर| Tilaknagar

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे-बेलापूर हमरस्त्यालगत गुरुवारी रात्री 2 च्या सुमारास दरोड्याचा बनाव करुन एका विवाहित तरुणास त्यांच्याच घरात साडीने गळफास देऊन त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन तरुणांना काल दुपारीच ताब्यात घेतले असून त्यात एक नगरचा तर दुसरा बीड येथील असल्याचे समजते. दरम्यान मयत तरुणाच्या पत्नीसही काल सायंकाळी शहर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून तिची उशिरापर्यंत चौकशी सुरु होती.

एकलहरे-बेलापूर रस्त्यालगत नईम रशिद पठाण (वय 32) यांची शेतवस्ती आहे. नईम आपल्या पत्नीसह याठिकाणी वास्तव्यास होता. काल रात्री 2 वाजेच्या सुमारास चार पुरुष व एक महिलेने घरात घुसून नईमची पत्नी बुशरा हिला मारहाण करुन नईमला घरातील लहान बाळांच्या झोक्यासाठी बांधलेल्या साडीने गळफास देऊन त्यांची निर्घृणपणे हत्या करुन घरातील लाखोंची रक्कम घेऊन पोबारा केला, अशी माहिती मयत नईमची पत्नी बुशरा पठाणने एकलहरे येथे वास्तव्यास असलेले तिचे वडील अन्वर शेख यांना देताच गावातील सरपंच पतीसह घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमा झाली. सरपंच पती अनिस शेख यांनी पोलिसांना घटनेची माहिती देऊन ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे कार्यक्षेत्रात संदेश दिला.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, शहर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.

गुरुवारी सकाळी जिल्हा गुन्हा अन्वेषणची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. तर ठसेतज्ञ, श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते, मात्र श्वान घटनास्थळाच्या अवती भोवतीच मर्यादित राहिले. बेलापूर-उक्कलगाव रस्त्यावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे दरोडेखोर लवकर हाती लागण्याची दाट शक्यता आहे. घटनेच्या कालावधीत एक चार चाकी स्विफ्ट कार या रस्त्याने वारंवार गेल्याचे दिसून येत आहे.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरुध्द भादंवि कलम 394, 396 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा दरोडा नसून वेगळाच प्रकार असल्याचा संशय पोलिस अधिकार्‍यांना आला. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवधन गवळी यांनी यांचे पथक व स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने समात्तर तपास सुरु केला.

या तपासात अनेक संशयास्पद बाबी समोर आल्याने पोलिसांनी तांत्रीक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. त्यात हा दरोडा नसून दरोड्याचा बनाव करण्यात आल्याचे पालिसांच्या लक्षात आले.

काल दिवसभर घेतलेल्या परिश्रमामुळे आरोपींपर्यंत पोलिस पोहचू शकले. काल दुपारीच नईम यांचा दफनविधी झाल्यानंतर परत येत असताना यात सहभागी नगर येथील एका तरुणास स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. तो नगर येथील रहिवासी असून सध्या राहुरी येथे नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. त्यानंतर बीड येथील एका तरुणास ताब्यात घेतले.

दरम्यान दरोडखोरांनी मारहाण केल्यामुळे जखमी झाल्याचे सांगत असलेली मयत नईम याची पत्नी बुशरा हिला श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तरुणांच्या तपासात तसेच बुशरा हिचे वेगवेगळ्या पोलिस अधिकार्‍यांनी घेतलेल्या जबाबात विसंगती आढळल्याने तिच्याबाबत पोलिसांचा संशय बळावल्याने तिलाही काल रात्री उशिरा चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच बुशराची जवळची नातेवाईक असलेली महिला व तिच्या पतीलाही उशिरा ताब्यात घेतले आहे.

या हत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी आर्थिक देवाण-घेवाण व नाजुक कारण यामागे असावे असा पोलिसांना संशय आहे.

अंत्यविधी करण्यास नातेवाईकांचा नकार

मृत नईमच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी आरोपींना तात्काळ गजाआड करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत मयत नईमची अंत्यविधी करण्यास नकार दिल्याने परिसरात तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, सरपंच पती अनिस शेख, ज्येष्ठ पत्रकार लालमोहमद जहागीरदार, शेतकरी संघटनेचे नेते अहमद जहागीरदार, अझहर जहागीरदार यांनी सदर प्रकरण हाताळले व अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी ठोस आश्वासन देत सदर गुन्ह्याचा तपास अंतिम टप्प्यात असून उद्या सकाळपर्यंत आरोपी गजाआड करण्यात येतील. असे आश्वासन दिले. त्यानंतर नईमचा अंत्यविधी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात काल दुपारी करण्यात आला.

मृत नईमला पवित्र मका मदिनेत श्रद्धांजली

सेवा सोसायटीचे चेअरमन अन्सार जहागीरदार, माजी अध्यक्ष नूरअहेमद शेख सह गावातील अनेकजण पवित्र मका-मदिना यात्रेला गेले असून मृत नईमला त्याठिकाणी श्रध्दांजली वाहून आरोपी लवकरच गजाआड व्हावे व मृत नईमला न्याय मिळावा यासाठी विशेष दुवा करण्यात आली. मयत नईम पठाण याचा बेलापूर येथे बॅटरीचा व्यवसाय होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com