प्रेयसीच्या भावाला दारू पाजून कालव्यात फेकले

श्रीगोंदा तालुक्यातील प्रकार || नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल|| जानेवारीतील ‘त्या’ मृत्यूचे गुढ अखेर उलगडले
प्रेयसीच्या भावाला दारू पाजून कालव्यात फेकले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिलेने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथील विश्वनाथ भापकर याने आधी तिच्या पतीचे चारचाकी वाहन पेटवून दिले. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने थेट मित्राच्या मदतीने तिच्या भावाला श्रीगोंदा रोडवरील चिखली घाटाच्या शेजारील जंगलात अतिप्रमाणाम दारू पाजून कुकडी कालव्याच्या पाण्यात फेकून देत त्याचा खून केला. सागर झरेकर (25 वय) राहणार घोसपुरी (ता. नगर) असे मृत तरूणाचे नाव आहे. ही घटना 14 जानेवारीला घडली होती.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सुनील चव्हाण यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात भादवी 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक समजलेली माहिती अशी, 15 जानेवारीपासून सागर झरेकर हा बेपत्ता असल्याची तक्रार नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल होती. मात्र, सागरचा तपास लागत नव्हता. यामुळे सागरच्या आई-वडीलांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेवून शोध घेण्याची मागणी केली. त्यावर पाटील यांनी हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक कटके यांच्याकडे सोपवले.

कटके यांनी या प्रकरणाचा समांतर तपास करत असतांना सागरच्या नातेवाईक (मेहूणे) यांच्या घरासमोर असणारी गाडी कोणीतरी पेटवली होती, अशी माहिती त्यांना मिळाली. सागर बेपत्ता झाल्यापासून त्यांच्या बँक खात्यावर कोणताच व्यवहार झाला नाही. पैसे खात्यातच असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे प्रकरण वेगळेच असल्याचा संशय आला. यामुळे कटके यांनी विशेष पथकाची स्थापना करून त्यांना कामाला लावले.

दरम्यान, कटके यांच्या पथकला बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनूसार साकेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील गौरव साके याने सागर झरेकर याचा घातपात केल्याचे समजले. त्यानूसार पोलीसांनी साके याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सागरबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिले. त्यानंतर पोलीस खाक्या दाखवताच सागरच्या बहिणीवर विश्वनाथ उर्फ सुशांत भापकर एकतर्फी प्रेम करत होता. समोरून प्रतिसाद मिळत नसल्याचा राग मनात धरून त्याने त्रास देण्यास सुरूवात केली. यासाठी तिच्या भावाला दारू पाजून ठार मारण्याचा कट भापकरने रचला. यासाठी साकेला 50 हजार रुपये देण्याचे कबूल केले. 14 जानेवारीला सागरला चिखली घाट परिसरात बोलावून त्याला अतिप्रमाणात दारू पाजली. तसेच त्याला दुचाकीवर बसवून कुकडी कालव्यात वाहत्या पाण्यात फेकून दिले. त्यात तो पाण्यात बुडाला.

या माहितीच्या आधारे पोलीसांनी कोळगावातील भापकरवाडीतून विश्वनाथ भापकरला याला ताब्यात घेतले. त्यावर त्याने गौरव साके यांच्या माहितीनूसार जबाब दिला. त्यानूसार महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा कट त्याने आखला आणि तिचा भाऊ सागर याची हत्या केली. त्यानंतर आपल्यावर संशय येवू नये यासाठी सागरच्या वडिलांना वारंवार इंडिकॉल अ‍ॅपव्दारे फोन करून तो जिवंत असल्याचे भासवत राहिला. सागरच्या मृत्यूनंतरही त्याच्या घरी व महिलेच्या पतीच्या घरी जावून जाळपोळ करत होता. विश्वनाथ याच्या जबाबवरून त्याच्यासह मित्रांवर खूनासह अन्य गुन्हे नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. घटना 14 जानेवारी रोजी श्रीगोंदा तालुक्यात घडली असून स्थानिक गुन्हे शाखेने तपास केल्यानंतर नगर पोलीस ठाण्यात 2 सप्टेंबरला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भापकर विरोधात गंभीर दाखल

या प्रकरणातील आरोपी विश्वनाथ भापकर याच्या विरोधात बेलवंडी, श्रीगोंदा आणि नगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com