बनावट सातबारे बनवून बँकेला गंडा : दोघांना पोलीस कोठडी

बनावट सातबारे बनवून बँकेला गंडा : दोघांना पोलीस कोठडी

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे बुद्रुक येथील सात जणांनी संगनमताने बनावट शेतीचे सातबारा उतारे, फेरफार तसेच खोटे दस्त तयार करून श्रीगोंदा शहरातील आयडीबीआय बँकेकडून २५ लाख ६१ हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली.

अंकुश जालिंदर वैद्य आणि महेश सोपान राऊत (रा. पीसोरे बु) यांना न्यायालयासमोर हजर केले असता २५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बाकीचे आरोपी अद्याप अटक नसले तरी अधिक तपासात अश्याच प्रकारे बनावट कागदपत्रे करून बँकांची फसवणूक करण्याचे प्रकाराची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

श्रीगोंदा तालुक्यात मागील पाच ते सहा वर्षांपासून बनावट कागदपत्रे तयार करून मूळ मालकांच्या परस्पर जमिनी विकणारी टाळीचे कारनामे जाहीर असताना याच प्रकारे बनावट जमिनीचे सातबारा तयार करून, आहे ती जमीन क्षेत्र वाढवून बँकांना गंडा घालण्याचे प्रकार झालेले असताना आता आयडीबीआय बँक मॅनेजर अजय पोपट दानवे यांच्या फिर्यादीवरून पिसोरे बुद्रुक मधील सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा शहरातील आयडीबीआय बँकेकडून तालुक्यातील पिसोरे बुद्रुक येथील अंकुश जालिंदर वैद्य यांनी 4 लाख 60 हजार रुपये, जालिंदर खंडू वैद्य 2 लाख रुपये, वैभव दादा थोरात 3 लाख रुपये, सोपान दादा राऊत 3 लाख रुपये, चंद्रकला शिवाजी राऊत 4 लाख 95 हजार रुपये, महेश सोपान राऊत 3 लाख 11 हजार रुपये, मीना सोपान राऊत 4 लाख 95 हजार रुपये असे एकूण 25 लाख 61 हजार रुपये पीक कर्ज सन 2017 ते 2018 या कालावधीमध्ये घेतले होते.

या पीक कर्जाचा एकही हप्ता न भरल्याने हे पीक कर्ज थकीत होते. बँकेचे शाखाधिकारी अजय दानवे यांनी डिसेंबर 2021 मध्ये थकीत कर्जाच्या कागदपत्रांची तपासणी करत असताना त्यांना या कागदपत्रात शेतीचे खोटे सातबारा उतारे, फेरफार तसेच खोटे दस्त दिल्याचे दिसून आले. त्यांनी बँकेचे वकील सुभाष संभाजी बोरुडे यांच्या मार्फत पीक कर्ज तसेच त्यावरील व्याज भरण्यासाठी 21 मार्च 2022 रोजी अधिकृत नोटीस पाठविली.

या नोटीस ला कोणतेही उत्तर न मिळाल्याने शाखाधिकारी दानवे हे आपल्या सहकार्‍यांसह पीक कर्जाच्या वसुली साठी संबंधितांकडे गेले असता त्यांनी कर्ज भरण्यास नकार दिला. यामुळे 7 जणांवर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यातील अंकुश जालिंदर वैद्य आणि महेश सोपान राऊत या दोन जणांना पोलिसांनी अटक केले असून इतर 5 जण पसार झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com