चार जिल्ह्यात घरफोडी व गंभीर गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

नगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई
चार जिल्ह्यात घरफोडी व गंभीर गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

शिर्डी (शहर प्रतिनिधी)

नगर, औरंगाबाद, जालना, बीड असे चार जिल्ह्यात धुमाकूळ घालून जबरी चोरी, दरोडा, घरफोडी, बेकायदा हत्यार बाळगणे, मारामारी अशा गंभीर स्वरूपाचे सुमारे २२ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असणाऱ्या टोळीतील दोघा सराईत गुन्हेगारांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

शिर्डीतील नालारोडलगत असलेल्या सितानगरमधील गोंदकर वस्तीवरील हरिओम बंगल्यात सात अज्ञात दरोडेखोरांनी कटावणीच्या सहाय्याने मुख्य दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. आजी आणि नातवाला धारदार शस्त्राचा धाक दाखवत रोख रकमेसह सोने-चांदी असा सुमारे १२ लाख २० हजार रुपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला होता. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दरोडा आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करत सराईत गुन्हेगार यांचे फोटो फिर्यादी व साक्षीदार यांना दाखवले यावरून त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींचा तपास सुरू असतांना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा अनिल भोसले व त्याचा भाऊ गुलब्या भोसले दोघेही रा. गोंडेगाव, ता. नेवासा व त्यांच्या टोळीतील साथीदारांनी मिळून केला आहे.

गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, पोहेकॉ सुनील चव्हाण, मनोहर गोसावी, पोना शंकर चौधरी, संदीप दरंदले, पोकॉ प्रकाश वाघ, मयुर गायकवाड, सागर ससाणे, जालिंदर माने, रोहित येमुल, चालक पोहेकॉ उमाकांत गावडे असे आरोपींचा शोध घेत असताना सराईत गुन्हेगार वारंवार आपले वास्तव्य बदलून राहत होते. परंतु पथकातील अधिकारी हे आरोपींच्या मागावर होते.

आरोपी अनिल भोसले व त्याचा भाऊ गुलब्या भोसले दोघेही आपल्या घरी आले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने त्यांनी तातडीने गोंडेगाव (ता. नेवासा) येथे जाऊन आरोपींना पकडण्यासाठी सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र मोठ्या शिताफीने त्यांना पकडून त्यांची नाव एक पत्ता विचारला असता यासीनखाँ उर्फ अनिल शिवाजी भोसले व सुंदरसिंग उर्फ गुलब्या शिवाजी भोसले, रा. गोंडेगाव ता. नेवासा असे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे वरील नमूद गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता सदरील गुन्हा हा त्यांनी व त्यांच्या साथीदारांनी मिळून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यापैकी एक साथीदार विधिसंघर्षीत बालक असून इतर पसार आरोपींचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही. यावेळी ताब्यातील आरोपींनी गुन्हे केलेल्या चार जिल्ह्यातील ठिकाणांची माहिती दिली असून यामध्ये श्रीरामपूर-शिर्डी, नेवासा, शनिशिंगणापूर, लोणंद, पाथर्डी, आदी सह अन्य पोलिस ठाण्यात जबरी चोरी, दरोडा, घरफोडी चोरी अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com