पाथर्डी : शिराळ चिचोंडी येथे गोळीबार, एक जखमी

दगडफेकीत पंधरा जखमी, माजी सभापतीचा समावेश
शिराळ चिचोंडी
शिराळ चिचोंडी

करंजी (वार्ताहर)- पाथर्डी तालुक्यातील शिराळ (चिचोंडी) येथे रविवारी दुपारी बाराच्या सुमारास शेतीच्या वादातून दोन गटांत झालेल्या तुफान हाणामारीत एका गटाकडून गोळीबार करण्यात आल्याने एक तरुण जखमी झाला. एकमेकांवर तुफान दगडफेकही करण्यात आल्याने सुमारे 15 ते 20 जण दगडफेकीत जखमी झाले. जखमींमध्ये पंचायत समितीच्या माजी सभापतीचा समावेश असल्याचे समजते.

शिराळ येथील अमोल श्रीधर वाघ व सचिन बाळासाहेब वाघ यांच्यात शेतातील पाईपलाईनचे फिल्टर मोडल्याच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर रविवारी दुपारी या वादाचे मोठ्या संघर्षात रूपांतर झाल्याने गोळीबार झाला. सुरुवातीला हवेत गोळीबार केल्यानंतर दुसरी गोळी अमोल वाघ यांच्या पायाला लागल्याचे सांगण्यात आले. या हाणामारीत तलवारी, काठ्या, मिरची पूडचा देखील वापर करण्यात आल्याचे पोलीस अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले. चार चारचाकी गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याने दोन्ही बाजूचे सुमारे 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये काही महिलांनाही जबर मारहाण करण्यात आली असून एका महिलेचा हात फ्रॅक्चर झाला आहे. पाथर्डी पंचायत समितीच्या माजी पदाधिकार्‍याचा देखील जखमीमध्ये समावेश असल्याची माहिती समजली आहे.

घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. फायर झालल्या पिस्टलसह घटनास्थळाचे इतर बारकावे शोधण्यासाठी श्वान पथकासह धातूशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. रविवारी सायंकाळपर्यंत पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार सिंह घटनास्थळावरून पोलिसांना सूचना देत होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com