तब्बल तीस लाखांच्या तेलाचा अपहार; चोर गजाआड

तब्बल तीस लाखांच्या तेलाचा अपहार; चोर गजाआड

संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेरातील वाहनातून आणलेल्या 30 लाखांहून अधिक किंमतीच्या खाद्यतेलाच्या अपहार या प्रकरणात दोघा सूत्रधारांना पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून सुमारे साडेआठ लाख रुपयांच्या तेलासह दीड लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर येथील सूरत येथील एकेटी लॉजिस्टीक या कंपनीने मोडासा ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून संगमनेरातील अफजलखान साहेबखान पठाण (रा.मोमीनपुरा, संगमनेर) यांच्या मालकीच्या मालट्रकमधून (क्र.एम.एच.17/ए.जी.7789) चालक अरुण उदमले (रा.पोखरी हवेली, ता.संगमनेर) याने अदानी कंपनीतून फॉर्च्युन सनफ्लॉवर तेलाचे प्रत्येकी 15 लिटरचे 1 हजार 90 डबे व एक लिटर पॅकींग असलेले व एका डब्यात दहा लिटर तेल असलेले दोनशे डबे होते. प्रत्यक्षात मात्र सदरचे वाहन पुण्यात न जाता राजगुरुनगर (खेड) येथे पोहोचले असता त्यातील तेलाचा सगळा माल एम.एच.12/एफ.झेड.8797 या दुसर्‍या वाहनात उतरविला गेला.

याप्रकरणात एकेटी लॉजिस्टीक कंपनीचे अशोककुमार चौधरी यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला वाहनाचा चालक अरुण उदमले व मालक अफजलखान पठाण यांना या प्रकरणी आरोपी करुन तपास सुरु केला. त्यातून राजगुरुनगर येथे क्रॉसिंग झालेला माल बीड जिल्ह्यातील आष्टी येथे नेण्यात आला व तेथे तो पुन्हा दोन वेगवेगह्या आयशर वाहनांमध्ये विभागण्यात आल्याची तोकडी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी काष्टीत छापा घातला असता हा प्रकार अहमदनगरमधील नरेंदर राजेंद्रसिंग रोतेला (वय 41, रा.पाईपलाईन रोड) व अनिल भारत मीरपगार (वय 30, रा.तारकपूर) या दोघांनी केल्याचे समोर आले.

शहर पोलिसांनी गोव्यात जावून त्या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यानुसार पोलिसांनी पुन्हा नगरमध्ये छापा घालीत 8 लाख 33 हजार 580 रुपयांचे प्रत्येकी 15 लिटर खाद्यतेल असलेले 330 डबे व दीड लाख रुपयांची रोकड असा एकूण 9 लाख 83 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला. या प्रकरणात अहमदनरमधील दोन्ही आरोपींना गजाआड करण्यात आले असून उर्वरीत मालाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com