कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न; आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावास

कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न; आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावास

संगमनेर (प्रतिनिधी)

व्याजाने दिलेले १० हजार रुपये मिळत नसल्याने एकावर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी ठोठावली आहे.

सतीश दशरथ अरगडे (वय ३८, रा. निमगावजाळी, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, निमगावजाळी येथील रहिवाशी शिवाजी सुखदेव अरगडे याने सतीश दशरथ अरगडे याचेकडून व्याजाने १० हजार रुपये घेतले होते. ते पैसे मिळावे म्हणून सतीश याने शिवाजीकडे तगादा सुरू केला होता. दि. ५ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ७.३० वाजता सतीश अरगडे हा शिवाजी अरगडे याचे घरी गेला. तेथे त्याने शिवीगाळ करत शिवाजीकडे पैशांची मागणी केली. त्या कारणावरून सतीश याने शिवाजीच्या हातावर, मानेवर, पाठीवर कोयत्याने वार केले. सदर घटना घडत असताना शिवाजी याचा भाऊ संजय सुखदेव अरगडे हे येथून जात असताना त्यांनी भांडण सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र सतीश अरगडे याने संजय यांच्यावर देखील कोयत्याने वार केला.

जखमी शिवाजी अरगडे व संजय अरगडे यांना उपचारार्थ प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत संभाजी सुखदेव अरगडे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सतीश दशरथ अरगडे, गणपत शिवाजी वदक, शोभा वदक (रा. निमगावजाळी) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ७१/२०२१ भारतीय दंड संहिता ३०७, १०७, ५०४, ५०६ प्रमाणे दाखल करण्यात आला. तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

सदर घटनेवेळी साक्षीदार याने सदर घटनेचे त्याचे मोबाईलमध्ये शुटिंग केले होते. सदर मोबाईल हा न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा कलिना (मुंबई) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. सदर मोबाईलमध्ये घटनेचे शुटिंगमध्ये आरोपी हा घटनेच्या ठिकाणी हातामध्ये कोयता घेऊन दिसला आहे, असा अहवाल दिला होता. तसेच साक्षीदार शिवाजी व संजय अरगडे यांचे जखमेबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल दिला होता. यासोबत सदर खटल्यात १३ साक्षीदार तपासण्यात आले. जखमी यांची साक्ष व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अहवाल या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरले. पुराव्याअंती सदर खटल्यात जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी आरोपी सतीश दशरथ अरगडे यास भारतीय दंड संहिता ३०७ कलमाखाली ५ वर्षे सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड, ५०४ कलमाखाली ६ महिने कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.

तर सदर गुन्ह्यातील इतर आरोपी अजय उर्फ गणपत शिवाजी वदक व शोभा शिवाजी वदक यांना फिर्यादीने साक्षीदारांनी तपासी अधिकारी यांचेकडे अॅफिडेव्डीट व पुरवणी जबाबामध्ये आरोपी २ व ३ विरुद्ध गैरसमजुतीने फिर्याद दिली असा जबाब दिल्यामुळे आरोपी २ व ३ यांना त्याचा फायदा देऊन आरोपातून निर्दोष मुक्त केले आहे.

सदर केसमध्ये सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी कामकाज पाहिले. सदर केसमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक बर्डे, महिला पोलीस कॉन्स्टेबल दिपाली दवंगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण डावरे, सहाय्यक फौजदार सुनील सरोदे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सारिका डोंगरे, पोलीस नाईक राम लहामगे, पोलीस नाईक लाटे यांनी पैरवी केली.

Related Stories

No stories found.