दहावीला गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून अत्याचार
सार्वमत

दहावीला गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून अत्याचार

शेवगाव तालुक्यातील शाळेच्या शिपायाचे कृत्य : नगरमध्ये गुन्हा दाखल

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

दहावीच्या परीक्षेत जास्त गुण मिळवून देतो असे म्हणून एका शिपायाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. सुंदर पोपट कसबे (राहणार-दहिगाव, तालुका-शेवगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या नरधामाचे नाव आहे.

नगर शहरातील रहिवासी असलेल्या पीडित मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटना सन 2019 व फेब्रुवारी 2020 दरम्यान शेवगाव तालुक्यातील दहिगाव येथे आरोपीच्या शेतामध्ये घडल्या. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुंदर कसबे याने शेवगाव तालुक्यातील एका शाळेवर दहावीच्या वर्गात प्रवेश घ्यायला लावला. त्या शाळेवर कसबे शिपाई म्हणून नोकरीला आहे.

सन 2019 मध्ये एके दिवशी कसबे मला नोटीस देण्याचे निमित्त करून तारकपूर बस स्थानकावर आला. तेथे मला बोलवून घेतले. बळजबरीने मला त्याच्या दुचाकीवर बसवून दहिगाव येथील त्याच्या शेतामध्ये घेऊन गेला. दहावीच्या परीक्षेत मदत करून जास्त मार्क मिळून देतो, असे म्हणत त्याने माझ्याशी गैरवर्तन करून अत्याचार केला.

तसेच, फेब्रुवारी 2020 मध्ये कसबे याने मला दहिगाव येथील त्याच्या राहत्या घरी राहण्यासाठी नेले. त्याच्या पत्नीला खोटे बोलून त्याने मला वेळोवेळी शेतात घेऊन जात माझ्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी सुंदर कसबे विरोधात अत्याचार, विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

जिल्ह्यातील प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या शाळेवर आरोपी सुंदर कसबे शिपाई म्हणून नेमणुकीस आहे. दहावीच्या परीक्षेत मदत करण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर कसबे याने वेळोवेळी अत्याचार केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यामुळे ही शिक्षण संस्था आरोपी कसबे विरोधात काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com