विवाहितेला मारहाणप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

दोन लाखांसाठी छळ ; आरोपी चासनळी, राजुरी व लोणीतील
विवाहितेला मारहाणप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

राहुरी (प्रतिनिधी)

बंगला बांधण्यासाठी व ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित महिलेचा शारिरीक व मानसिक छळ करून तिला मारहाण करण्यात आली. या घटनेबाबत सासरच्या सात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्षा हरिश चांदगुडे रा. चासनळी, ता. कोपरगाव या महिलेचा १९ मे २०१४ रोजी हरिश विश्वनाथ चांदगुडे यांच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर ही महिला सासरी नांदण्यास गेली असता सुरवातीचे दिवस चांगले राहिले. दोन-तीन महिने व्यवस्थित नांदविले. त्यानंतर सासरी नांदत असताना सासू प्रभावती विश्वासराव चांदगुडे, सासरे विश्वासराव भाऊसाहेब चांदगुडे, पती हरिश विश्वासराव चांदगुडे हे तिघे रा. चासनळी व नणंद गुणवंता बाबासाहेब गोरे, बाबासाहेब तुकाराम गोरे हे दोघे रा. राजुरी, ता. राहाता, भाऊसाहेब विठ्ठल विखे रा. खळवाडी, लोणी, ता. राहाता, रुपाली महेश सिनारे रा. लोणी, ता. राहाता हे सर्वजण प्रतीक्षा हिस नेहमी बोलत असायचे. तुला मूलबाळ होत नाही. तुला स्वयंपाक नीट येत नाही.

तुला घरामध्ये स्वच्छता ठेवता येत नाही. तसेच घरातील बारीकसारीक गोष्टीवरून नेहमी त्रास देत. शिवीगाळ करून उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच घर बांधण्यासाठी व ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये. असे सांगत असे.

त्यानंतर प्रतिक्षाच्या आई वडिलांनी सासरकडील लोकांची समजूत काढून मुलीस पुन्हा नांदण्यास पाठवले. तरीही प्रतिक्षास पैसे आणण्यास सांगून त्रास सुरु झाला. त्यावर तिने सासऱ्याला सांगितले, माझे बाबा एवढे पैसे कुठून आणणार? त्यांची परिस्थिती गरीब आहे. ती महिला असे बोलल्याचा सासरकडील लोकांना राग आला व त्यांनी सर्वांनी तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली तिला घराबाहेर काढून दिले. पैसे घेऊन आल्यावरच तुला घरात घेऊ, असे सांगितले. तिने राहुरी पोलिसांत धाव घेऊन सासरकडच्या सात लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार महादेव शिंदे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com