करंजी घाटात ट्रक चालकास मारहाण करत लुटले

करंजी घाटात ट्रक चालकास मारहाण करत लुटले

तसगाव (वार्ताहर)

पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटातील माणिकपीर बाबा दर्गा जवळील धोकादायक वळणाजवळ एका ट्रक चालकास जबर मारहाण करून त्याला लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत ट्रक चालकाने पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेबाबत ट्रक चालक किसन नवनाथ मराठे राहणार मराठवाडी (ता. आष्टी) याने पाथर्डी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, मंगळवार (दि.7) रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास करंजीहून मराठवाडीकडे घाट चढून जात असताना घाटातील मानिकपीर बाबा दर्गाजवळ पल्सर गाडी वरून आलेल्या तिघा जणांनी ट्रकला मोटरसायकल आडवी लावून त्यातील दोघा जणांनी ट्रकमध्ये चढून गचांडी धरून चाकूने वार करून जबर मारहाण केली व ट्रकमधून ओढून खाली पाडले व लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केली.

या घटनेमध्ये आरोपींनी रोख रकमेसह 26 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला असून ट्रक चालकावर चाकूने हल्ला करत जबर मारहाण केल्याची घटना घडली. आरोपींकडे काळ्या रंगाची पल्सर गाडी होती व तिच्या पाठीमागच्या नंबर प्लेटवर फुलपावर असे लिहिलेले असून या आरोपींमध्ये एका जणाने साळवे असा नामोल्लेख केलेला असल्याचे फिर्यादीत म्हटले असून आता हा साळवे कोण? आणि फुलपावर नाव असलेली पल्सर कोणाची याचा पोलिसांकडून तपास सुरू असून या घटनेच्या तपासा संदर्भात गुरुवारी करंजी येथील दोन संशयित तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com