नेवासा तालुक्यातील व्यक्तीने दिली रूपाली चाकणकर यांना धमकी

नेवासा तालुक्यातील व्यक्तीने दिली रूपाली चाकणकर यांना धमकी

धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर | Ahmedagar | प्रतिनिधी

राज्य महिला आयोगाच्या (State Women's Commission) अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्यक्ती हा नेवासा (Newasa) तालुक्यातील भेंडा (Bhenda) येथील असून त्याला नगर तालुका पोलिसांनी (Nagar Police) आज सकाळी चिंचोडी पाटील (ता. नगर) येथून ताब्यात घेतले आहे.

भाऊसाहेब रामदास शिंदे असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला अटक करून दुपारी न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी दुपारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयात रूपाली चाकणकर यांना धमकीचा फोन आला होता. पुढच्या २४ तासांत रुपाली चाकणकर यांना जीवे मारु, असा धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती.

अहमदनगरमधील व्यक्तीने फोन केल्याची माहिती मिळताच अहमदनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरली. आज सकाळी सहायक निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या पथकाने चिंचोडी पाटील गावातून शिंदे याला ताब्यात घेतले आहे. अटकेची कारवाई सुरू असून दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. रुपाली चाकणकर यांना याअगोदरही दोन वेळा रुपाली चाकणकर यांना धमकीचे फोन आलेले होते. तुमचा कार्यक्रम करु, अशा प्रकारची भाषा त्या धमकीच्या फोनमध्ये वापरण्यात आली होती.

रुपाली चाकणकर सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. जुलै २०१९ मध्ये रुपाली चाकणकर यांच्यावर राष्ट्रवादीने महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. मार्च २०२२ मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची अडीच वर्ष जबाबदारी सांभाळली.

चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी सूत्रे हातात घेत अतिशय ताकदीने काम केलं. याचंच बक्षीस म्हणून त्यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलं. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे रुपाली चाकणकर यांचे कार्यालय आहे. २६ डिसेंबर २०२० रोजी एका व्यक्तीने फोन करत चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली होती. यावेळी रुपाली चाकणकर कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. याची माहिती मिळाल्यानंतर चाकणकर यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात सदर व्यक्ती विरोधात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com