बऱ्हाणपूरच्या ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार

नेवासा तालुक्यात खळबळ || लागलेल्या चारही गोळ्या काढल्या || प्रकृतीचा धोका टळला
बऱ्हाणपूरच्या ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार

चांदा | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील बर्‍हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्य व आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग खेळाडू संकेत भानुदास चव्हाण (वय 25) यांच्यावर मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली असून याबाबत त्यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून दोघांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह विविध गुन्हे दाखल झाले आहेत. रस्ता ठेकेदारी अथवा अन्य कारणावरून गोळीबार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. जखमी संकेत यांनी हल्लेखोरांना ओळखले असल्याचे त्यांच्या नातेवाईकाकडून सांगण्यात आले. हल्ल्यामागचे नेमके कारण समजले नाही. दोघा जणांविरोधात शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

श्री. चव्हाण हे कांगोणी फाट्यावरून बर्‍हाणपूर येथे रात्री साडेनऊच्या दरम्यान आपल्या घरी स्वतःच्या वाहनाने येत असताना भाऊसाहेब बच्छीराम काळे यांच्या शेताजवळ रस्त्याच्याकडेला लघुशंकेसाठी थांबले असता मोटारसायकलवरून आलेल्या दोघा इसमांनी गावठी कट्टयातून संकेत यांच्यावर गावठी कट्टयातून बेछुट गोळ्या झाडल्या. दंडात, पाठीवर व कमरेवर गोळीबार करून त्यांना जखमी केले. त्यांना तातडीने सिव्हिल रुग्णालयात व त्यानंतर खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. चांद्यातील घटनेला पंधरा दिवस उलटत नाही तोच बर्‍हाणपूर येथे झालेल्या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे

सदर घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे, शेवगाव उपविभागीय अधिकारी सुर्दशन मुंढे, सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, शिंगणापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागूल, हवालदार.माळवे, कटारे, शिंदे, सानप, चालक वजीर शेख तातडीने मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी हजर झाले. घटनेचा पंचनामा करून घटनास्थळी पडलेल्या रक्ताचे नमुने तपासासाठी नेले आहेत. या संदर्भात संकेत चव्हाण यांचे वडील भानुदास जगन्नाथ चव्हाण (वय 51) धंदा-शेती रा. बर्‍हाणपूर यांनी शिंगणापूर पोलिसात फिर्याद दाखल केली असून त्यात म्हटले की, मंगळवार 15जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास संकेत यांनी मला फोन केला व मला गोळ्या घातल्या असून तुम्ही लवकर या असे सांगितल्याने भानुदास चव्हाण हे कांगोणी फाटाच्या दिशेने गेले असता भाऊसाहेब काळे यांच्या शेतालगत रस्त्याच्या कडेला चार ते साडेचार फुट खड्डयात जखमी अवस्थेत मुलगा पडलेला आढळला.

त्याच्या डाव्या खांद्याला तसेच पाठीला, डाव्या बाजुच्या कमरेजवळ जखम होती व त्यातून रक्त वाहत होते. त्याला काय झाले हे विचारले असता मी लघुशंकेसाठी थांबलो असता पाठीमागून आलेल्या बाळासाहेब हापसे व विजय भारशंकर दोघेही रा. बर्‍हाणपूर या दोघांनी मला गोळ्या मारल्या. तेव्हा मी आमचे नातेवाईक रवी चव्हाण व शरद चव्हाण यांना घेऊन आम्ही संकेतला तातडीने उपचारासाठी नगर येथील खाजगी रुग्णालयात हलवले. तेथे रवी चव्हाण, शरद चव्हाण यांचे समोर संकेत यांनी सदर घडलेली घटना सांगितली. वरीलप्रमाणे माझ्या मुलाला तो करत असलेल्या रोडकॉन्ट्रॅक्टरच्या व्यवसायातून किंवा अज्ञात कारणातून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे.

संकेत यांच्या खांद्यावर दोन, पाठीच्या बरगडीजवळ एक गोळी, कमरेच्या खाली एक गोळी अशा चार गोळ्या लागल्या. भानुदास चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार शिंगणापूर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर कलम 69/2021 भारतीय दंड विधान कलम 307, 34 आर्म अ‍ॅक्ट कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सपोनी सचिन बागुल स्वतः घटनेचा तपास करत आहेत.

हल्लेखोरांना पकडण्यासाठी दोन पथके तयार केली असून लवकर हल्लेखोरांना पकडण्यात येईल. घटनेचा तातडीने तपास लावण्यात येईल असे श्री. बागुल यांनी सांगितले .दरम्यान संकेत यांच्यावर पहाटे शस्त्रक्रिया करण्यात आली असून लागलेल्या गोळ्या काढण्यात आल्या आहे त्याच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

रोड कॉन्ट्रॅक्टरच्या व्यवसायाचे कारण...

माझ्या मुलाला तो करत असलेल्या रोड कॉन्ट्रॅक्टरच्या व्यवसायातून अथवा अन्य अज्ञात कारणातून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचे जखमी संकेतचे वडील भानुदास जगन्नाथ चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. संकेतच्या खांद्यावर दोन, बरगडीजवळ एक तर कमरेच्या खाली एक अशा एकूण चार गोळ्या लागलेल्या असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com