हिंदूंच्या भावना दुखावल्याचा 11 जणांवर गुन्हा दाखल

नेवाशात अवैधरित्या कत्तलखाना चालवून प्रवरा पात्रात दूषित पाणी सोडले
हिंदूंच्या भावना दुखावल्याचा 11 जणांवर गुन्हा दाखल

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

जनावरांची कत्तल करण्यास निर्बंध असताना अवैधरित्या घरात कत्तलखाना चालवून भुयारी गटारीमार्फत रक्तमिश्रीत पाणी प्रवरा नदीत सोडून पाणी दूषित केल्याचा स्थळ पाहणी अहवाल नेवासा नगरपंचायतीला सादर झाला असून त्यावरुन दाखल फिर्यादीवरुन नेवासा शहराच्या दोन प्रभागांमधील 11 जणांवर पाणी दूषित केले व हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ताराचंद भागचंद चव्हाण (वय 52) धंदा - नोकरी (मुकादम) नेवासा नगरपंचायत यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की, दि. 4 ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाजातर्फे शहरातून प्रवरा नदीत जाणार्‍या दूषित व रक्तमिश्रीत पाण्याबाबत निर्णय घेवून संबधीतावर कार्यवाही व्हावी यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने मुख्याधिकारी यांनी स्थळ पाहणीकरीता मला व लिपीक परशुराम डौले यांना आदेश दिले होते. त्यानुसार आम्ही ज्या भुयारी गटार मधून हे पाणी येत आहे त्या प्रभाग क्र. 13 व 16 मधील भागाची 16 ऑगस्ट रोजी दुपारी स्थळ पाहणी केली.

तेव्हा सदर रक्तमिश्रीत पाणी हे तेथे राहणारे ईसम मुस्ताक उस्मान शेख, वाहिद बुढाण चौधरी, अकील जाफर चौधरी, रियाद कादर चौधरी, तोफीक आयाज चौधरी, जलाल अब्बाज चौधरी, सलिम भैय्या चौधरी, अब शामु चौधरी, अन्सार सत्तार चौधरी, वसीम गणी चौधरी, नदिम सत्तार चौधरी (सर्व रा. नेवासा खुर्द) यांचे घरातून येत असून ते रक्त मिश्रीत पाणी हे भुयारी गटारीमार्फत प्रवरा नदीपात्रात जात असल्याचे निदर्शनास आले. तसा अहवाल आम्ही 18 ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी यांना सादर केला. सदर अहवालाचे अनुषंगाने मुख्याधिकारी यांनी प्राधिकार पत्र देवून संबधीत इसमावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

वरील सर्व 11 जणांनी जनावरांची कत्तल करण्यास निर्बंध असताना अवैधरित्या घरात कत्तलखाना चालवून भुयारी गटारी मार्फत दूषित पाणी प्रवरा नदीपात्रात सोडुन पाणी दूषित करुन सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी भादंवि कलम 295 तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम कलम 269, 270 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com