
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
नातवाने आजोबावरच कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील नारायणवाडी येथे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. जखमी आजोबाला सोडविण्यासाठी आलेल्या चुलता, भाऊ आणि चुलतीवरही हल्ला केला असून त्यात ते देखील जखमी झाले आहेत.
नारायणवाडी येथील गोकुळ मधुकर क्षीरसागर हा रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्याच्या राहत्या घरासमोर कोयता हातात घेऊन घराच्या दरवाज्यासमोर कोयता मारत होता. आजोबा जालिंदर मुकिंदा क्षीरसागर यांनी त्याला दरवाजावर कोयता मारण्याचं कारण विचारलं असता त्यावर आरोपी नातू गोकुळ म्हणाला की, मला लग्नाला इतकी वर्षे झाले तरी मुलबाळ होत नाही. आता तुमच्याकडे बघतोच तुम्हाला मारुनच टाकतो असे म्हणून त्याने आजोबांच्या तोंडावर कोयत्याचे वार केले.
अचानक झालेल्या या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. गोकुळला रोखण्यासाठी त्याचे चुलते बाबासाहेब जालिंदर क्षीरसागर, चुलती स्वाती बाबासाहेब क्षीरसागर आणि चुलत भाऊ विश्वास बाबासाहेब क्षीरसागर हे आले. मात्र गोकुळने त्यांच्यावरही कोयत्याने वार केला. त्यात ते जखमी झाले. जखमींवर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपी गोकुळ क्षीरसागरला पोलिसांनी अटक केली.
तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी आरोपी गोकुळ क्षीरसागर याला नेवासा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.