तडीपार आरोपी तोफखाना पोलिसांकडून जेरबंद

वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता शहरात
तडीपार आरोपी तोफखाना पोलिसांकडून जेरबंद

अहमदनगर|Ahmednagar

शहरातून दोन वर्षांकरीता तडीपार असलेला विजय राजू पठारे (रा. सिद्धार्थनगर) हा त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी

नगर शहरात आला असता तोफखाना पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्कालीन पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्‍या 15 टोळ्यातील 67 जणांना जिल्ह्यातून तडीपार केले होते. यातील 54 जणांना 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये विजय राजू पठारे याचाही समावेश आहे. तडीपार पठारे याचा मंगळवारी वाढदिवस होता.

वाढदिवस साजरा करण्यासाठी पठारे हा मंगळवारी सकाळी सिद्धार्थनगरमध्ये आला होता. पठारे हा तडीपार असतानाही शहरामध्ये आला असल्याची गोपनीय माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हारूण मुलाणी यांना मिळाली. निरीक्षक मुलाणी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक समाधान सोळुके, पोलीस कर्मचारी दत्ता जपे, वसीम पठाण यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या.

पथकाने सिद्धार्थनगर परिसरात सापळा लावून तडीपार आरोपी पठारे याला अटक केली. त्याच्याविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड, शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com