
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे मनोरुग्ण पतीने 57 वर्षीय पत्नीवर कुर्हाडीने वार करून ठार मारल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.
संगीता रोहीदास पंदरकर असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती रोहिदास पंदरकर हा पोलीस पाटील शिवणकर यांच्यासोबत स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली आहे. दरम्यान रोहिदास हा मनोरुग्ण असून मागील काही वर्षांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, पिंपळगाव विसापूर रस्त्यावरील पंदरकर मळ्याच्या शिवारात रोहिदास पंदरकर आपल्या पत्नी मुलांसोबत सोबत वास्तव्यास होते.
शनिवारी पहाटे 4 ते 4.30 वाजेच्या सुमारास पत्नी संगीता पंदरकर हिच्या गळ्यावर धारदार कुर्हाडीने घाव घातला. त्यात संगीता पंदरकर गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव पिसाचे पोलीस पाटील सुनील शिवणकर यांनी बेलवंडी पोलीसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक बोत्रे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करुन पोलीस पंचनामा केला. खूनाचे कारण स्पष्ट नाही. मात्र कौटुंबिक कारणामुळे खून झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित रोहिदास याला पोलिसांनी अटक केली आहे.