‘तो’ अकस्मात मृत्यूू नव्हे, खूनच !

पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील घटना
‘तो’ अकस्मात मृत्यूू नव्हे, खूनच !

पारनेर|तालुका प्रतिनिधी|Parner

पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील गवळीबाबा देवस्थानजवळ रविवारी (दि. 26) अनोळखी पुरुष जातीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. त्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून याबाबत चिमा नामदेव चिकणे यांनी दिलेल्या खबरीवरून पारनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

अनोळखी इसमाचा हत्याराने खून केल्यानंतर मारेकर्‍याने कसलाही पुरावा घटनास्थळी राहणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली होती. तरी देखील मृताची ओळख पटविण्यात आली. मृताची पत्नी जनाबाई राघू कोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशनचे सपोनी राजेश गवळी यांनी तपासाची चक्रे फिरवून प्राप्त पुरावे, फोटो, जबाब व गोपनीय यंत्रणेच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार राघू कोकरे याच्याबाबत सुरेश उर्फ सहादू राजाराम खताळ (वय 32, रा. ढवळपुरी, ता. पारनेर) याच्या मनात राग होता, असे पुढे आले.

त्यानुसार आरोपीस 29 जुलै रोजी अटक करण्यात आली. आरोपीची न्यायालयाकडून पोलीस कोठडी घेऊन आरोपीकडून विचारपूस करता त्याने त्याचा भाऊ संतोष उर्फ लालू राजाराम खताळ यास गुन्ह्यात निष्पन्न करून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. अटक आरोपींकडे कसून चौकशी केली.

पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या सूचनेप्रमाणे सपोनि राजेश गवळी, पोलीस उपनिरीक्षक पद्मने व बोकील, पोहेकॉ शेळके, पोलीस ना. खाडे, पोलीस कॉ. भालचंद्र दिवटे, पोलीस कॉ. सत्यजित शिंदे, पोलीस कॉ. डमाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com