अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी

तरूणाकडे एक लाखाची मागणी || महिलेसह तिघांविरूध्द गुन्हा
अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तरुणाकडे एक लाखाची खंडणी मागणार्‍या महिलेसह तिघांविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिव्हिल हाडको परिसरातील भारत चौकात राहणार्‍या तरूणाने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. मंगळवारी सायंकाळी चार वाजता बोल्हेगाव उपनगरात ही घटना घडली.

फिर्यादी तरुण मंगळवारी सायंकाळी बोल्हेगाव येथे असताना त्याने एका अनोळखी महिलेला फोन करून मुलगी आहे का?, अशी विचारणा केली. त्या महिलेचा होकार येताच त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो मागितले. महिलेने फोटो पाठविले व भेटण्यासाठी तिच्या बोल्हेगाव येथील राहत्या घरी बोलविले.

तो तरुण घरी जाताच तेथे दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी घराचा दरवाजा बंद केला. ‘तू येथे कशासाठी आला, तू पैसे दिले नाही तर तुझ्यावर गुन्हा दाखल करू,’ अशी धमकी देत महिलेने एक लाख रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. शेवटी त्या महिलेने फिर्यादी तरुणाकडे 25 हजार रुपयांची मागणी करत तिच्यासह मुलीच्या अंगावरील कपडे फाडले.

दरम्यान घाबरलेल्या तरूणाने येथून पळ काढला. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना देत संबंधित महिलेसह दोन अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात अधिक तपास पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com