विवाहीत महिलेवर बाप लेकाकडून सलग 9 वर्षे अत्याचार

विवाहीत महिलेवर बाप लेकाकडून सलग 9 वर्षे अत्याचार

राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पारनेर पोलीस ठाण्यात वर्ग

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी येथील 35 वर्षीय महिलेवर पारनेर तालुक्यातील एका बड्या घराण्यातील बाप लेकांनी सलग नऊ वर्षे जोर जबरदस्ती करत तसेच वेगवेगळे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. सदर महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत पारनेर येथील भंडारी नामक बाप लेका विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी शहर हद्दीत राहणारी एक 35 वर्षीय विवाहित महिला सन 2010 पासून पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील संतोष भंडारी यांच्याकडे मोल मजुरीचे काम करण्यासाठी गेली होती. सदर महिला 2010 पासून ते 2019 पर्यंत भंडारी यांच्या घरी घरकाम करत होती. तर तिचा पती भंडारी यांच्या किराणा दुकानात मजुरीचे काम करत होता. सदर पती पत्नी त्यांच्या एका खोलीत राहत होते. काही दिवसांनी संतोष शांतिलाल भंडारी याने सदर महिलेला विविध प्रकारचे आश्वासन देऊन तिच्याशी बळजबरीने शारिरीक संबंध केले.

हे सर्व त्याचा मुलगा राजेश संतोष भंडारी याला समजले. तो सदर महिलेला म्हणाला, तुझे व माझ्या वडिलांचे शारिरीक संबंध आहेत. माझ्याशीपण शारिरीक संबंध ठेव. नाहीतर हे सर्व मी सगळ्यांना सांगेन. अशी धमकी देऊन त्यानेही सदर महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला. संतोष भंडारी व राजेश भंडारी या बाप-लेकाकडून वारंवार होणार्‍या अत्याचाराला कंटाळून हा सर्व प्रकार मी माझ्या पतीला सांगणार आहे. असे सदर महिलेने त्यांना सांगितले. त्यावर त्या बाप -लेकांनी तू जर आमचे नाव कोठे घेतले किंवा कोणाला काही सांगितले तर तुझ्यावर व तुझ्या पतीवर चोरी आणि इतर खोटे गुन्हे दाखल करून अडकवून टाकू, अशी धमकी दिली आणि तिच्यावरील अत्याचार चालूच ठेवले.

बाप-लेकाच्या अत्याचाराला कंटाळून सदर महिला व तिचा पती टाकळी ढोकेश्वर सोडून राहुरीत आले. दरम्यान सदर महिलेने 15 मार्च 2021 रोजी पारनेर पोलीस ठाण्यात लेखी स्वरूपाची तक्रार दिली होती. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.

दरम्यान संतोष भंडारी व राजेश भंडारी आणि नगर येथील एका राजकीय पुढार्‍याने सदर महिलेला समक्ष बोलावून तू तक्रार मागे घे. नाहीतर तुला व तुझ्या कुटुंबाला गायब करून मारून टाकू, अशी धमकी देऊन तिच्या पतीला मारहाण केली. सदर महिलेने राहुरी पोलिसांत धाव घेतली. तिने दिलेल्या फिर्यादीवरून संतोष शांतिलाल भंडारी व त्याचा मुलगा राजेश संतोष भंडारी दोघे राहणार टाकळीढोकेश्वर, तालुका पारनेर या बाप-लेका विरोधात वारंवार बलात्कार करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करून गुन्हा पारनेर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पारनेर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक घनःश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान उगले करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com