टिव्ही पाहण्याच्या कारणातून भावाने केला छोट्या बहिणीचा खून

केडगावच्या सचिननगर मधील घटना
टिव्ही पाहण्याच्या कारणातून भावाने केला छोट्या बहिणीचा खून

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

टिव्ही पाहण्याच्या कारणातून भावाने बहिणीचा हातोडा डोक्यात घालून खून केल्याची धक्कादायक घटना केडगावातील सचिननगर मध्ये घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केडगाव उपनगरातील सचिननगर येथे राहत असलेल्या एका कुटुंबातील १२ वर्षीय भावाने आपल्या ९ वर्षांच्या बहिणीच्या डोक्यात हातोडा घातला. यामुळे गंभीर जखमी झालेल्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी अहमदनगर शहरातील उपनगर असलेल्या केडगाव ही दुर्दैवी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

घरामध्ये दोघे बहिण- भाऊ टिव्ही पाहत होते. त्यांचे आई-वडील शनिवारी सायंकाळी नवीन घर पाहण्यासाठी सावेडी येथे गेले होते. सायंकाळनंतर बहीण- भाऊ घरामध्ये टिव्ही पाहत होते. काही वेळानंतर टिव्ही चैनल बदलण्यावरून दोघांमध्ये वाद झाले. या वादातून भावाने घरामध्ये असलेला हातोडा बहिणीच्या डोक्यात घालून जीव घेतला. यानंतर भावाने आपल्या मृत बहिणाचा मृतदेह बाथरूममध्ये टाकला.

भयभीत झालेल्या भावाने घरातील लॅपटॉप व पैसे घेऊन केडगाव बायपास येथील एक हॉटेल गाठले. तेथे असलेल्या मॅनेजर कडे त्याने नोकरीची मागणी केली. मॅनेजरने त्याच्या वडिलांना फोन करून तुमचा मुलगा हॉटेलवर येऊन नोकरी मागत असल्याची माहिती दिली. यानंतर सावेडी येथे गेलेल्या आई- वडिलांनी केडगाव येथील घर गाठले. घरामधील बाथरूममध्ये त्यांची ९ वर्षाची मुलगी मृतावस्थेत आढळली.

घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, निरीक्षक प्रवीण लोखंडे, उपनिरीक्षक नितीन रणदिवे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोतवाली पोलिसांनी खून करणाऱ्या बालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com