
कर्जत । प्रतिनिधी
जावयाला टेम्पो खाली चिरडून ठार मारण्याची घटना कर्जत तालुक्यातील कौडाणे गावामध्ये घडली. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. या प्रकरणी सासऱ्यासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील कौडणा आणि मुळेवाडी येथील सुद्रिक व मुळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. यामध्ये दत्तात्रय जाणू मुळे (वय ३८) राहणार कौडाणे (तालुका कर्जत) हा सूद्रिक यांचा जावई असून तो पत्नीच्या माहेरी मुलास पाठवत नसल्याने वादावादी होवून यामध्ये दत्तात्रय जानू मुळे याच्या अंगावर टेम्पो घालून क्रमांक एम एच १६, ए ई ४९३७ ने त्याला चिरडून ठार मारण्यात आले.
याप्रकरणी रवींद्र बाबासाहेब सूद्रिक, बाबासाहेब दत्तात्रय सुद्रिक, नरेंद्र सदाशिव सूद्रिक, विठ्ठल सदाशिव सुद्रिक, अमोल बाबासाहेब सुद्रिक, सदाशिव दत्तात्रय सुद्रिक (सर्व राहणार मुळेवाडी तालुका कर्जत) व विनोद प्रशांत गोल्हार (राहणार कापसी, तालुका-आष्टी जिल्हा-बीड) यांच्या विरोधात कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुनील मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीत मध्ये म्हटले आहे की, दिनांक 26 मे या दिवशी वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी वरील सर्व जण कौडाणे येथे आले होते .यावेळी त्यांनी सोबत एक टेम्पो आणला होता आणि त्यामध्ये त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणारे वीस ते पंचवीस मुले देखील होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वरील सर्व जण टेम्पो मध्ये बसून जात असताना माझा मुलगा मयत दत्तात्रय हा तेथे आला व त्याने टेम्पो अडविला व सुद्रिक यांना माझा मुलगा टेम्पो मध्ये घेउन जाऊ नका त्याला खाली उतरवा अशी विनंती करत होता मात्र त्याला खाली सोडत नसल्यामुळे अखेर दत्तात्रय टेम्पोवर चढला व काचेवर त्याने हाताने बुक्की मारली.
या नंतर त्यांची शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. यानंतर काहीजणांनी दत्तात्रय मुळे यास चापटी मारल्या. यानंतर दोघा जणांनी दत्तात्रेयास जमिनीवर आपटले. त्याच वेळी विनोद गोल्हार वेगळ्या रंगाचा 407 टेम्पो हा भरधाव वेगाने आणून दत्तात्रय मुळे याच्या अंगावरुन घातला. टेम्पोचे टायर त्याचे डोके आणि छातीवरून गेल्यामुळे तो जागीच ठार झाला.या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे.