
कर्जत | प्रतिनिधी
राज्यभरातील भाविकांचे आराध्यदैवत असलेल्या राशीन येथील श्री जगदंबा देवीची हातवारे करून व चुकीच्या पद्धतीने बोलून विटंबना करत भावना दुखावणाऱ्यास कर्जत पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली.
विनय मेघराज बजाज (रा. राशीन ता. कर्जत) या इसमाने बुधवारी सायंकाळी जगदंबा देवीसाठी असणाऱ्या दर्शन रांगेतून न येता विरुद्ध दिशेने मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला. राज्यभरातील भाविकांचे आराध्यदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री जगदंबा देवीला हातवारे करून चुकीच्या पद्धतीने बोलून, विटंबना करत भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्यामुळे राशीनसह परिसरातील भाविक भक्तांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध व्यक्त केला.
याबाबत अॅड. सचिन रेणूकर यांच्यासह प्रतिभा सचिन रेणुकर (रा. जगदंबा मंदिराशेजारी राशीन ता.कर्जत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विनय बजाज याच्यावर कलम २९५, २९५ अ, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निंदनीय असल्याने उपस्थित नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला.
घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, पोलीस अंमलदार मारुती काळे, तुळशीदास सातपुते, संपत शिंदे यांनी आरोपीस तात्काळ अटक केली. घटनेच्या तपासकामी त्याला जास्तीत जास्त १५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यासाठी कर्जत पोलिसांकडून न्यायालयास अहवाल सादर करण्यात येणार आहे.
आरोपीस लवकर जामीन होऊ नये यासाठीही न्यायालयात प्रयत्न करण्यात येणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केले आहे.
आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असुन यामुळे तमाम जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आरोपीला लवकर जामीन होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेतच, मात्र त्याच्या तडीपारीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे.
चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत