टिळकनगर |वार्ताहर| Tilknagar

संपूर्ण जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या गुटखा छापा प्रकरणी अजूनही काही रहस्य गुलदस्त्यातच आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रातील आठवाडी शिवारात गुलाबाच्या बागेलगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पोलीस यंत्रणेने अर्धा कोटी रुपयांचा गुटखा साठा जप्त केला, मात्र या जागेच्या मालकाचा शोध पोलीस यंत्रणेला एक आठवडा उलटूनही लागला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

तसेच जागेच्या मूळ मालकाचा शोध लागत नसल्याने पोलीस प्रशासनाने महसूल विभागाची मदत घेऊन लगतचे उतारे तपासले असता राज्य शेती महामंडळाच्या टिळकनगर स्टेट फार्मिंगसोबत पत्रव्यवहार केला.

राज्य शेती महामंडळाच्या टिळकनगर स्टेट फार्मिंगचे एकलहरे आठवाडी शिवारातील असलेल्या पडीक जमिनीवर गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून अतिक्रमण झाल्याने ही जमीन फक्त सात बारा उतार्यावर असून, या जमीन अतिक्रमणाबाबत स्थानिक मळ्यावरील अधिकारी आता जागे झाले आहेत. कारण या जमिनी लगतच्या शेतात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा सापडला होता.

अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी पुढील तपास आपले कौशल्य पणाला लावून त्यात यश मिळवले. मात्र मुख्य आरोपी शोधत असताना पुढे त्यांनी ज्या जागेवर गुटखा साठा सापडला त्या मूळ मालकाचा तपास कासवगतीने सुरू केला. या परिसरात सुमारे 100 एकर क्षेत्र असून लगत शेती महामंडळाचे दोन तुकडे आहेत.

एक क्षेत्र दोन एकरचे तर दुसरे क्षेत्र साडे चार एकर आहे. या क्षेत्रालगत असलेल्यांनी हे क्षेत्र पूर्णपणे हडप केल्याने गुटखा छाप्यातील मूळ मालकाचा शोध घेत असताना पोलीस प्रशासन चक्रावले आहे.त्यामुळे पोलीस प्रशासन शेती महामंडळाकडे यासंदर्भात माहिती घेत आहे.

शेती महामंडळाला प्रथमतः प्रकरणाशी संबंधित असलेल्या गटात महामंडळाची शेती आहे की नाही हेच माहीत नसल्याचे समोर आले आहे.

लवकरच गुटखा छापा क्षेत्र कोणाचे व अतिक्रमण कोणाचे, छाप्यातील ठिकाणच्या मालकांचा अतिक्रमणमध्ये समावेश आहे का, ज्या खासगी शेतकर्याने ज्याला कराराने शेती दिली होती त्या जागेत गुटखा छाप्याच्या अड्ड्याचा समावेश होतो का, हे पुढे तपासात लवकरच समोर येईल.

दरम्यानच्या काळात पोलिसांनी एकलहरे येथील करीम आजम शेखसह एका अन्य शेतकर्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ताब्यात घेण्याआगोदर करीम आजम शेख पुण्याला गायब झाला होता, त्यामुळे पोलिसांची तपासाची सुई त्यादिशेने गेली, पोलिसांनी या दोघांना पोलीस ठाण्यात आणून योग्य ती माहिती घेऊन त्यास तूर्तास घरी पाठविले, आता पोलिसांचा अस्सल तपास शेती महामंडळाकडे वळाला आहे.

गुटखा तपास पोलिसांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून करत असताना मात्र छाप्यातील ठिकाणच्या मूळ जागा मालक शोधार्थ तपास कामाला अतिक्रमण क्षेत्र असल्याने पोलिसांची मोठी दमछाक होत आहे, याकामी बेलापूर पोलीस मात्र बारकाईने लक्ष ठेऊन असून, जागा मालकाचा शोध व होणारी पळापळी यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.

गुटखा छाप्यातील ठिकाणाच्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून पत्र प्राप्त झालेले आहे. मी टिळकनगर मळ्यात नवीन कार्यान्वित झालो असल्याने परिसरातील प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास नसल्याने अतिक्रणाबाबत कल्पना नाही, गुटखा छाप्यातील ठिकाणाच्या गटाचे तात्काळ उतारे काढून सदर गटात शेती महामंडळाचे क्षेत्र असल्यास लगेच भूमिअभिलेख कार्यालयाला याबाबत माहिती देऊन तात्काळ मोजणी करण्यात येईल व ज्या संबंधित शेतकर्यांनी अतिक्रमण केलेले आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- अशोक कोल्हे, स्थावर व्यवस्थापक टिळकनगर मळा

गुटखा प्रकरणात तपास जलदगतीने होत आहे. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी फरार आहे. ज्या ठिकाणी छापा पडला होता, त्या ठिकाणच्या मालकाचा शोध चालू असून, लवकरच त्याचा उलगडा होईल, जागा मालकाचा संबंधित गुटखा प्रकरणात सहभाग कोणत्या प्रकारे होता किंवा त्यासोबत कोण कार्यान्वित होते. तसेच ज्याठिकाणी गुटखा सापडला आहे त्याठिकाणाहून माल कुठेकुठे व कोण पोहोच करीत असे याबाबत सखोलपणे माहिती घेणे चालू आहे.
- डॉ.दीपाली काळे, अप्पर पोलीस अधीक्षक