
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
मद्य प्राशन केलेल्या युवकाने हॉटेलच्या चालकास मारहाण करून जोरदार राडा केल्याची घटना रविवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घुलेवाडी परिसरातील हॉटेल पद्मिनी मध्ये घडली. राडा करणार्या युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घुलेवाडी येथे राहणारा आकाश देवकर हा पद्मिनी हॉटेलमध्ये आला होता. त्यानेेे मद्य प्राशन करून हॉटेलचेे चालक अक्षय भडांगे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या झटापटीत भडांगे यांची चेन तुटून नुकसान झाले. हा राडा बराच वेळ सुरू होता.
घटनेनंतर भडांगे यांनी रात्री उशिरा शहर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी आपली कैफियत ठाणे अंमलदार यांना सांगितली. मात्र ठाणे अंमलदार गुन्हा दाखल करत नव्हते. हे ठाणे अंमलदारही दारूच्या धुंदीत असल्याचे दिसत होते. यावेळी मारहाण करणार्या देवकर याची पत्नी ही शहर पोलीस ठाण्यात आलेली होती. तिनेही पोलीस ठाण्यात उपस्थित पोलिसांशी चांगलीच हुज्जत घातली. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गोंधळ सुरू होता. आरोपीच्या छातीवर ‘गुन्हेगार’ असे गोंदलेले होते, तो ठाणे अमंलदाराना वारंवार आपली छाती दाखवत होता. गुन्हेगाराची पोलीस ठाण्यात दहशत सुरू असताना ठाणे अंमलदार मात्र बघ्याची भूमिका घेऊन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करताना दिसत होते.
यानंतर उशिरा हॉटेल चालकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकाश देवकर याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 98/2023 भारतीय दंड संहिता कलम 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आला आहेे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल धनवट करत आहेत.