सोनई पोलिसांनी पुण्यात जप्त केला आणखी एक गावठी कट्टा व काडतुसे
सार्वमत

सोनई पोलिसांनी पुण्यात जप्त केला आणखी एक गावठी कट्टा व काडतुसे

आरोपी अटकेतील घोडेगावच्या निलेश केदारचा मित्र; 3 जुलै पर्यंत पोलीस कोठडी

Arvind Arkhade

सोनई (वार्ताहर)- 25 जून रोजी सोनई पोलिसांनी घोडेगाव येथे एका तरुणाच्या ताब्यातठून गावठी कट्टा हस्तगत केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या तपासानंतर पुण्यातील त्याच्या मित्राकडून त्याने त्याला विकलेला आणखी एक कट्टा व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात सोनई पोलिसांना यश आले आहे.

याबाबत माहिती अशी की, 25 जून रोजी आरोपी निलेश उर्फ नीलकंठ मधुकर केदार रा. घोडेगाव ता. नेवासा याचे ताब्यातून एक गावठी कट्टा हस्तगत करून गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी निलेश मधुकर केदार यास अटक करून त्याच्याकडे गुन्ह्यासंदर्भात कौशल्यपूर्वक तपास करून त्याने त्याचा मित्र विजय बाळू सोनवणे रा. आदर्शनगर उरुळी देवाची ता. हवेली जिल्हा पुणे यास आणखी एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे विकल्याची कबुली दिली.

त्यावरून सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी व सोनई पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि जनार्दन सोनवणे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व पूर्वपरवानगीने सपोनि ज्ञानेश्वर थोरात हवालदार दत्ता गावडे, कॉन्स्टेबल बाबा वाघमोडे यांचे पथक तयार करून पुणे येथे रवाना केले.

सदर पथकाने पुणे येथे जाऊन हडपसर पोलीस ठाण्याचे पथकाची मदत घेऊन गुन्ह्यातील आरोपी विजय बाळू सोनवणे याचा शोध घेऊन व त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे पंचांसमक्ष हस्तगत केले.

आरोपी विजय बाळू सोनवणे यास सोनई पोलीस स्टेशनला आणून अटक करून त्यास न्यायालयात हजर केले असता सदर आरोपीस 13 जुलैपर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मिळाली आहे गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि जनार्दन सोनवणे हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री अखीलेश कुमार सिंह अहमदनगर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे मॅडम पोलीस उपाधीक्षक मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे सपोनि ज्ञानेश्वर थोरात पोहकॉ चव्हान पोहकॉे दत्ता गावडे पोना शिवाजी माने पोकॉ विठ्ठल थोरात पोकॉ बाबा वाघमारे पोकॉ सचिन ठोंबरे यांनी केली आहे

आरोपी विजय बाळू सोनवणे याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात 2017 मध्ये भारतीय दंड विधान कलम 302, 394 (अ) 34 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचबरोबर हडपसर पोलीस ठाण्यात 2018 मध्ये भारतीय दंड विधान कलम 307, 397, 34 प्रमाणे जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

Deshdoot
www.deshdoot.com