अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जमीन विक्री व्यवहारातील फसवणुकीच्या गुन्ह्यात पसार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर शहरातील लालटाकी भागात सापळा लावून अटक केली.

पुरूषोत्तम बाबुराव कुरूमकर (रा. लिंपणगाव ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

शिरूर (जि. पुणे) येथील एकनाथ बाळासाहेब बांदल यांची जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाली होती. कर्जत तालुक्यातील गुरूव पिंप्री येथे बांदल यांनी 22 एकर जमीन विकत घेतली. जमिनीचे मुळ मालक मयत झाले असल्याचे माहिती असतानाही पुरूषोरूत्तम कुरूमकर व त्याच्या साथीदारांनी मयत व्यक्तीच्या जागी बनावट इसम उभा करून बनावट खरेदीखताद्वारे जमिनीची विक्री केली.

जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बांदल यांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाले होते. गत 25 दिवसांपासून पोलीस पसार आरोपींचा शोध घेत होते. मात्र ते पोलिसांना गुंगारा देत होते. आरोपी पुरूषोत्तम कुरूमकर हा नगर शहरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.

त्यानुसार निरीक्षक कटके यांनी आपल्या पथकाला लालटाकी भागात सापळा लावण्याचे आदेश दिले. आरोपी कुरूमकर लालटाकी भागात येताच पोलिसांनी त्याला अटक केली. कुरूमकर विरोधात कर्जत व श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.