चाकूचा धाक दाखवून मारहाण करत लुटले

ससेवाडी शिवारातील वस्तीवरील घटना; चौघांविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा
चाकूचा धाक दाखवून मारहाण करत लुटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चाकूचा धाक दाखवून दगड, काठीने मारहाण करत चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल असा 44 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. नगर तालुक्यातील ससेवाडी शिवारात महादेव आसाराम पवार (वय 47) यांच्या वस्तीवर शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या मारहाणीत महादेव पवार यांचा मुलगा मयूर व मुलगी मयुरी जखमी झाले आहेत. पवार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन ते चार अज्ञात चोरट्यांविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

महादेव पवार यांची ससेवाडी शिवारात वस्ती आहे. पवार यांच्यासह पत्नी बायजा, आई सुभद्रा, मुलगा मयूर व मुलगी मयुरी असे घरासमोर बाहेर झोपले होते. रात्री दोन वाजेच्या सुमारास तीन ते चार चोरटे त्यांच्या वस्तीवर आले. त्यांच्या हातामध्ये दगड, काठी व चाकू होता. त्यांनी मयूर व मयुरी यांना काठी व दगडाने मारहाण केली. यानंतर त्यांनी महादेव यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम काढून घेतली.

बायजा यांच्या कानातील सोन्याची दागिने व मोबाईल काढून घेत चोरटे तेथून पसार झाले. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे, सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधोर करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com