शेतकर्‍याचा खून, चौघांना आजन्म कारावास
सार्वमत

शेतकर्‍याचा खून, चौघांना आजन्म कारावास

पाथर्डी तालुक्यातील घटना : जिल्हा न्यायालयाचा निकाल

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे शेतीच्या वादातून शेतकरी अशोक शेंडे यांना मारहाण करून जीवे ठार मारण्यात आले होते. याप्रकरणी चौघा आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

जिल्हा न्यायाधीश आर. एम. कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. चंद्रकांत बर्फे (वय 44), अमोल बर्फे (वय 20), सुरेश आनंदा बर्फे (वय 57) शिवाजी आनंदा बर्फे (वय 45, सर्व रा. आडगाव, ता. पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. शेंडे यांना ठार मारल्यानंतर आरोपींनी मृतदेहावर पेट्रोल टाकून पेटवून देत पुरावा नष्ट केला होता.

यात न्यायालयाने त्यांना दोषी धरत आजन्म कारावास व 32 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली आहे. 11 ऑक्टोबर 2018 रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी राजू शेंडे हे घरी असताना त्यांचे मोठे बंधू अशोक शेंडे यांनी त्यांच्या मोबाईलफोनवरून फिर्यादी यांना फोन केला.

त्यावेळी फिर्यादी यांचे बंधू अशोक व इतर लोकांमध्ये वादावादी चालु असल्याचे फिर्यादी यांना ऐकू आले. त्यांनी त्यांच्या भावाशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण संभाषण होऊ शकले नाही.

अशोक यांच्या भावाने शेतात माहिती घेतली असता कोणीही आढळून आले नाही. काही जणांनी त्यांना अशोक यास आरोपीनी मारहाण करून त्यांच्या दुचाकीवरे बसवून घेऊन गेल्याचे सांगितले. अशोक सापडून न आल्याने त्यांच्या भावाने पाथर्डी पोलीस ठाण्यात आरोपींविरुध्द रितसर फिर्याद दिली.

दुसर्‍या दिवशी सकाळी अशोकचा मृतदेह अर्धवट जाळलेल्या स्थितीत धारवाडी गावच्या शिवारात करंजी ते चिंचोडी जाणार्‍या रोडलगत आढळून आला. पोलिसांनी तपास करून आरोपींना ताब्यात घेतले. गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे यांनी केला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com