राहाता |तालुका प्रतिनिधी|Rahata

रयत शिक्षण संस्था तसेच तलाठीपदी नोकरी लावून देतो, असे सांगून सात जणांची 57 लाखांची फसवणूक करणार्या रयत शिक्षण संस्थेच्या

दोन शिक्षकांसह आणखी एक अशा तीन आरोपींना पकडण्यात राहाता पोलिसांना दोन महिन्यांनंतरही यश न आल्याने या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी मागणी फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे केली आहे. या गुन्ह्याचा तपास लाऊन आरोपींना अटक करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री व लोकप्रतिनिधींनाही साकडे घालू, असे फसवणूक झालेल्यांनी निवेदनात म्हटले आहे.

या फसवणूक प्रकरणी दि. 31 ऑक्टोबर रोजी राहाता पोलिसांनी तक्रार दाखल करून बिना सोनवणे, तिचा पती दिनेश सोनवणे, दोघे रा. नाशिक जिल्हा, तिसरा भाऊसाहेब पेटकर, रा. लोणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हे तिनही आरोपी पसार झाले असून दोन महिन्यांनंतरही पोलिसांना सापडत नाहीत.

यातील बिना सोनवणे ही राहाता येथे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत हंगामी शिक्षिका म्हणून काम करत होती तर तिचा पती दिनेश हा धुळे येथे मोठा अधिकारी असल्याचे ती सांगत असे. ते दोघे शिक्षीत गरजवंत असलेल्या सुशिक्षीत बेरोजगार तरुण व महिलांना हेरत असे. काहींना रयतमध्ये शिक्षकांची नोकरी लावून देतो, असे सांगत.

त्यासाठी रयतचे दुसरे वरिष्ठ लिपीक भाऊसाहेब पेटकर याच्याशी मिटींग घडवून आणून आतापर्यंत किती जणांना नोकरी लावून दिली हे पेटकर नावानीशी त्यांना पटवून देत असे. रयतमध्ये पदाधिकारी यांच्या वशिल्याने काम नक्की करून देऊ त्यासाठी रोख रकमा तसेच चेक किंवा ऑनलाईन रकमाही स्विकारल्या जात असे. तर तलाठी व इतर पदांसाठी सोनवणे पती-पत्नी हे पैसे घेत होते. या काळात दोघेही साकुरी व राहाता येथे राहत होते.

या तिघांचे बरेच नातेवाईक रयत शिक्षण संस्थेत सेवेत कार्यरत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे असून पोलीस या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करत असून दोन महिन्यांनंतरही यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी सापडत नसल्याने तसेच आरोपी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पेटकर यांच्या अटकपूर्व वर 12 जानेवारीला सुनावणी

पेटकर याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात अर्ज दाखल केला असून पोलिसांनी याबाबत कागदपत्रे न्यायालयाला सादर केली असून अटकपूर्व अर्जावर 12 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. तक्रारदारांच्यावतीने बाजू मांडण्यासाठी वकील देणार असल्याचे तक्रारदार धिरज पाटील व त्यांच्या सहकार्यांनी सांगितले.