आरोपींचे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन
सार्वमत

आरोपींचे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन

पोलिसांना एकास पकडण्यात यश तर दुसरा सराईत गुन्हेगार पसार

Arvind Arkhade

माळवाडगाव|वार्ताहर|Malvadgav

श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथील सासर्‍याकडून जावयाचा खून, प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेला मुख्य आरोपी सचिन काळे व बुंदी भोसले यांनी ग्रामीण रूग्णालयाच्या आवारातून हातातील बेड्यासह पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याने खळबळ उडाली.

रात्री उशिरा शिरसगाव शिवारात उसात दडून बसलेल्या भोसले यांस पकडण्यात श्रीरामपूर तालुका पोलिसांना यश आले मात्र कुख्यात आरोपी सचिन काळे मुठेवाडगांव-कमालपूर मार्गे चोरीची मोटारसायकल घेऊन पसार झाल्याने पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

अडीच महिन्यांपूर्वी 7 मे 2020 रोजी रात्री शेतीमहामंडळ लगतच्या मुठेवाडगाव शिवारात पारधी वस्तीवर पूर्वीचे सोने देणे घेणे वादातून सासरा व त्याच्या सहकार्‍याकडून जावई मयूर आकाश काळे (वय 28) यांचा खून झाला होता. या खूना संदर्भात मुख्य आरोपी सचिन काळे (सासरा मुळ राहणार भेंडाळा, ता.गंगापूर ) सहकारी बुंदी भोसले (रा.मिरजगांव ता.कर्जत) सुरज भोसले या तिघांना अटक केली होती.

श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या ताब्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सचिन काळे व बुंदी भोसले यांस शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. सायंकाळी 5.30 च्या सुमारास आवारात पोलीस व्हॅनमध्ये बसताना बुंदी भोसले याने पोलिसांची नजर चुकवून पोबारा केला.

यावेळी तीन पोलीस एक ड्रायव्हर असे चौघेजण होते. तिघांनी भोसलेंच्या मागे धाव घेतल्याने गाडीत बसलेल्या सचिन काळे यानेही हरेगावच्या दिशेने धूम ठोकली. असा घटनाक्रम उपस्थितीत बघ्याकडून सांगण्यात येतो. शिरसगाव शिवारात निकाळजे यांच्या उसात दडून बसलेल्या बुंदी भोसले यांस पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र पोलीस यंत्रणा व आरोपीच्या शिवपाटी, लपाछपी खेळामुळे सुदर्शन लक्ष्मण निकाळे या छोट्या शेतकर्‍यांचे उसाचे मोठ्या प्रमणावर नुकसान झाले.

एक आरोपी सापडला असला तरी कुख्यात आरोपी सचिन काळे यांच्या शोधासाठी तालुका पोलीस निरीक्षक मसूद खान सर्व सहकारी पोलिसांनी हरेगांव, मुठेवाडगांव शिवार पिंजून काढला. मात्र रात्री दोनच्यानंतर माळवाडगांव कमालपूर रस्त्यावर वस्तीवर राहत असलेले समाधान भागवत मुठे हे लघुशंकेसाठी उठले असताना दारात चप्पल आढळली नाही. म्हणून पुढे अंगणात उतरले तर मोटारसायकलही आढळली नाही. चप्पल व गाडी चोरून नेताना चोरट्याने जाताना पुन्हा कंपाऊंड चे गेट लावण्याची काळजी घेतली हे विशेष.

मुठे यांनी रात्रीच पोलिसांसह परिसरात भ्रमणध्वनीवरून खबर दिल्याने ही मोटारसायकल पसार आरोपीनेच कमालपूर मार्गे गंगापूरकडे जाण्यासाठी नेली असावी. असा पोलिसांचा संशय बळावल्याने तपासाची दिशाही बदलण्यात आली. सकाळपासून पोलीस यंत्रणा कमालपूर बंधार्‍यानजिकच्या गांवात तर एक पोलीस पथक भेंडाळा गंगापूरकडे रवाना झाले होते.

Deshdoot
www.deshdoot.com