९७ लाख चोरणारे गवसले; ६० लाखांची रोकड हस्तगत

कर्जत व पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई
९७ लाख चोरणारे गवसले; ६० लाखांची रोकड हस्तगत

कर्जत | प्रतिनिधी

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये कलम ३८१ मधील पाहिजे असलेला आरोपी विजय महादेव हुलगुडे (रा. जामखेड) व त्याचे साथीदार पुणे येथून दि.५ ऑक्टोबर रोजी ९७ लाख रुपयांची बॅग चोरी करून पसार झाले होते.

आरोपीचा शोध येरवडा पोलीस व गुन्हे शाखा, पुणे शहर हे घेत होते. त्या अनुषंगाने येरवडा पोलीस आणि क्राईम युनिट ५ यांनी कर्जत पोलीस स्टेशनला या आरोपीचा शोध घेण्याबाबत कळविले होते. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

कर्जत पोलीस तपास करत असताना सदरचे आरोपी हे विर ता. पुरंदर जि. पुणे येथे असल्याची खात्रीशीर बातमी बातमीदाराकडून मिळाली. आरोपी कर्जत- जामखेड परिसरातील असल्याने त्यांची गुन्ह्याची पद्धत माहिती असल्याने कर्जत पोलिसांनी तात्काळ हालचाली केल्या. क्राईम युनिट ५ चे जवानांना वीर येथे येण्याबाबत कळविले. आरोपी हे वीर येथील शाळेजवळ लपून बसलेले होते.

आरोपी विजय महादेव हुलगुंडे, (वय २५ वर्ष रा. काटेवाडी ता. जामखेड) व त्यास मदत करणारा आरोपी नाना रामचंद्र माने, (वय २५ वर्षे रा. मलठण ता. कर्जत) यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी नाना माने मिळून आला. आरोपी विजय हुलगुंडे पळून गेला. त्यास कर्जत पोलिसांनी पाठलाग करून पकडला. आरोपींना कर्जत येथे आणून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर आणि क्राईम युनिट ५ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांच्या ताब्यात देण्यात आले.

कर्जत आणि पुणे पोलिसांनी कसून चौकशी केली. आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले. पुणे पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर, प्रसाद लोणारे व त्यांचे पोलीस जवान यांनी कर्जत पोलिसांच्या मदतीने ६० लाख रुपये हस्तगत केले. कर्जत पोलिसांनी रक्कम हस्तगत करण्यासाठी पुणे पोलिसांना मदत केली. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहे.

ही कारवाई डीवायएसपी आण्णासाहेब जाधव तसेच पुणे विभागातील पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस अंमलदार श्याम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम तसेच पोलीस निरीक्षक युनूस शेख, हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, रवींद्र आळेकर, पोलीस अंमलदार अजय गायकवाड, अश्रूबा मोराळे, अमजद शेख, कैलास डुकरे, चेतन चव्हाण, गणेश वाघ पुणे शहर यांनी केली.

Related Stories

No stories found.