नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

कोर्टात चालू असलेला दावा मागे घ्यावा यासाठी महिलेशी असभ्य वर्तन करुन तिच्यासह तिच्या पतीला कुर्हाडीने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

केल्याची घटना तालुक्यातील गिडेगाव येथे घडली असून या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघा आरोपींना अटक करण्यात येवून पोलीस कोठडी मिळाली. अन्य आरोपींनाही अटक करावी अशी मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.

याबाबत अहमदनगर येथे उपचार घेत असलेल्या महिलेचा 12 मार्च रोजी जबाब घेवून 13 मार्च रोजी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कोर्टातील दावा मागे घ्यावा यासाठी 7 मार्च रोजी सकाळी नारायण चांगदेव साळुंके याने शेतात घास कापण्यासाठी आले असता असभ्य वर्तन केले. त्यानंतर काही वेळाने माझे पती व मी घरात बसले असताना नारायण चांगदेव साळुंके, किशोर चांगदेव साळुंके, अनिकेत किशोर साळुंके, सचिन नारायण साळुंके, संदीप नारायण साळुनके, सुशीला नारायण साळुंके, मनिषा किशोर साळुंके, उज्वला किशोर साळुंके, हर्षदा संदीप साळुंके (सर्व रा. गिडेगाव ता. नेवासा) तसेच बापूसाहेब नामदेव आगळे व नामदेव विठोबा आगळे (दोघेही रा. शिरसगाव ता. नेवासा) हे सर्व 11 जण अचानक घरात घुसले व शिवीगाळ करु लागले.

तुम्ही नेवासा कोर्टात केलेला दावा काढून का घेत नाही? असे म्हणून धमकी देवू लागले. आम्ही त्यांना समजावून सांगत असताना नारायण चांगदेव साळुंके याने त्याच्या हातातील कुर्हाडीने माझ्या दोन्ही पायांच्या नडघीवर मारहाण करुन गंभीर दुखापत केली. किशोर चांगदेव साळुंके याने त्याचे हातातील लोखंडी गजाने हातावर व पाठीवर मारहाण केली. तसेच अनिकेत किशोर साळुंके व सचिन नारायण साळुंके या दोघांनी मला त्यांचे हातातील कुर्हाडीने माझे पायावर मारहाण केली.

बापूसाहेब आगळे, नामदेव आगळे, सुशिला साळुंके, मनिषा साळुंके, उज्वला साळुंके, हर्षदा साळुंके अशा सर्वांनी मला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी माझे पती मध्ये पडले असता संदीप नारायण साळुंके याने त्याचे हातातील कुर्हाडीने माझ्या पतीच्या डोक्यावर, कपाळावर तसेच पायाच्या नडघीवर मारहाण करुन गंभीर दुखापत केली.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी वरील सर्व 11 आरोपींवर गुन्हा रजिस्टर 151/2021 भारतीय दंड विधान कलम 307, 452, 354, 323, 143, 144, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करत आहेत.

दरम्यान सदर घटनेतील आरोपींपैकी चौघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता आधी 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. त्यानंतर दोन दिवसांची वाढीव कोठडी देण्यात आली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे (कुर्हाड, गज) जप्त करण्यात आली आहेत. सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. अन्य आरोपींनाही अटक करावी अशी मागणी सदर महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.