फिर्याद व तक्रार मागे घ्यावी यासाठी वडुलेत दोन गटाच्या शिवीगाळ व धमकीच्या फिर्यादी

सरपंचांसह 7 जणांवर गुन्हे दाखल
फिर्याद व तक्रार मागे घ्यावी यासाठी वडुलेत दोन गटाच्या शिवीगाळ व धमकीच्या फिर्यादी

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

फिर्याद मागे घ्यावी या कारणावरुन शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना नेवासा तालुक्यातील आदर्श गाव वडुले येथे घडली. याबाबत परस्परविरोधी फिर्यादीवरुन सरपंचांसह दोन्ही बाजूच्या 7 जणांवर गुन्हा दाखल झाला असून पैकी दोघांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल झाला आहे.

याबाबत कैलास बबन पवार (वय 43) धंदा- शेती रा. वडुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नामदेव नरोटे व एकनाथ नरोटे दोन्ही रा. वडुले ता. नेवासा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या फिर्यादीत म्हटले की, वडुले येथे येडूमाता देवस्थान चौकात 26 व 27 सप्टेंबर रोजी यातील फिर्यादी यास आरोपी यांनी मागील फिर्याद मागे का घेत नाही? असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर 739/2021 भारतीय दंड विधान कलम 504, 506 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1) (आर) (एस) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे करत आहेत.

दुसरी फिर्याद नामदेव भिमाजी नरोटे यांनी दिली असून त्यावरुन कैलास बबन पवार, कुमार जगन्नाथ पवार, एकनाथ भिमा माळी, बाळासाहेब शेषराव पवार, बबन शंकर देशमुख व दिनकर गर्जे सर्व रा. वडुले ता. नेवासा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फिर्यादीत म्हटले की, 29 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता फिर्यादी यांचे राहते घरासमोर वडुले येथे आरोपी यांनी गैरकायद्याची मंडळी एकत्र जमवून फिर्यादीच्या पत्नीस म्हणाले की, तुझ्या पतीने जी सरपंच दिनकर गर्जे यांच्याविरुद्ध सोसायटीत अफरातफर केल्याच्या चौकशीबाबत सहायक निबंधक यांच्याकडे दिलेली तक्रार मागे का घेत नाहूी? असे म्हणून फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपी दिनकर गर्जे याने फिर्यादीचा भाऊ यास तुझ्या मुलाविरुद्धची तक्रार मी मागे घेण्यास सांगता मला दोन लाख रुपये दे असे म्हणाला.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर 740/2021 भारतीय दंड विधान कलम 143, 147, 385, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक एम. एन. भताने करत आहेत.

Related Stories

No stories found.